मुंबई,दि.१: पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला शरद पवारांची उपस्थिती होती. यावरून काँग्रेस नेत्याने मोठं विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींना आज ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार, यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर उपस्थित राहिल्याने याचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत.
काँग्रेस नेत्याचे मोठं विधान
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि पंतप्रधान मोदी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमावर भाष्य केलं आहे. शरद पवारांची भूमिका वादग्रस्त वाटत असली तरी त्यातून वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण होईल, असा समज कुणाचा असेल तर तो गैरसमज आहे, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले, “शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला हजेरी लावणं, याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. त्यांनी खूप आधी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा शब्द दिला होता. त्यांनी स्वत: या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ घेतली. त्यामुळे ते या कार्यक्रमाला जातील. पण शरद पवारांनी हे टाळायला हवं, अशी जनभावना आहे. शेवटी तो शरद पवारांचा निर्णय आहे. यामुळे महाविकास आघाडीत काही फरक पडेल, असं मला अजिबात वाटत नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे.”
“निवडणुकीपूर्वी आलेले सर्व सर्व्हे पूर्णत: महाविकास आघाडीच्या बाजुने आहेत. जनमानस बदलत आहे. कोणालाही अशा अभद्र युत्या आणि पक्ष फोडणं मान्य नाही. अशा स्थितीत शरद पवारांची आताची भूमिका नक्कीच वादग्रस्त वाटत असली तरी त्यातून वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण होईल, असा कुणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे, एवढंच मी सांगू इच्छितो”, असंही वडेट्टीवार म्हणाले.