Congress On Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने व्हिडिओ काँग्रेसने केले ट्विट

0

नवी दिल्ली,दि.२३: Congress On Narendra Modi: काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जुने व्हिडिओ ट्विट केले आहेत. काँग्रेस नेते पवन खेरा (Pawan Khera) यांना आसाम पोलिसांनी दिल्ली विमानतळावर अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यासंदर्भात दाखल तक्रारीची दखल घेत आसाम पोलिसांनी दिल्ली विमानतळावर त्यांना अटक केली. मात्र, यावर थेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पवन खेरांना अंतरिम जामीन देण्याचे निर्देश दिल्ली न्यायदंडाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, या प्रकरणामुळे काँग्रेस विरुद्ध भाजपा असा कलगीतुरा सुरू झाला असून काँग्रेसनं आता मोदींचे काही जुने व्हिडीओ ट्वीट करत खोचक सवाल केला आहे.

काय म्हणाले होते पवन खेरा? | Pawan Khera

काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचा उल्लेख दामोदरदासऐवजी गौतमदास असा केला. त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर आपल्याकडून चुकून हे विधान बोललं गेल्याचं सांगत खेरा यांनी माफीही मागितली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात तातडीच्या सुनावणीची मागणी केल्यानंतर त्यावर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांना अंतरीम जामीन देण्याचे निर्देश दिले.

काँग्रेसने जुने व्हिडिओ केले ट्विट | Congress On Narendra Modi

दरम्यान, या सर्व प्रकरणावर काँग्रेसकडून भाजपाला खोचक सवाल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काही जुने व्हिडीओ ट्वीट केले आहेत. याबरोबर “यांना अटक कधी होणार?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

काँग्रेसनं ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जुन्या व्हिडीओंमधले तीन व्हिडीओ एकत्र केले आहेत. यात पहिल्या व्हिडीओमध्ये पंतप्रधानांनी ममता बॅनर्जींना उद्देशून “दीदी…ओ दीदी”, असं म्हटल्याचं दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये “भाईयो और बहनो, बदा दो इस देश में कभी किसीने ५० करोड की गर्लफ्रेंड देखील है?” असा खोचक प्रश्न विचारताना मोदी दिसत आहेत. तर तिसऱ्या व्हिडीओमध्ये “ये काँग्रेसकी कौनसी विधवा थी, जिसके खाते में रुपया जाता था”, असं विचारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत.

पवन खेरा यांना जामीन मंजूर होणार असला, तरी आता या प्रकरणावरून काँग्रेस विरुद्ध भाजपा असा सामना राष्ट्रीय पातळीवर पाहायला मिळत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here