बंगळुरू,दि.७: Congress News न्यायालयाने काँग्रेसचे “भारत जोडो यात्रा” ट्विटर अकाऊंट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात येत आहे. या यात्रेला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी राहुल गांधींचं स्वागत होत आहे.
त्यातच, सोशल मीडियावरुनही भारत जोडो यात्रेला ताकद देण्यात येत असून राहुल गांधींचे फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसच्या अकाऊंटसह भारत जोडो यात्रा नावानेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, ट्विटरवर अकाऊंट सुरू करण्यात आली आहेत. मात्र, यापैकी ट्विटरवरील भारत जोडो यात्रा हे अकाऊंट बंद होणार आहे. बंगळुरूमधील एका न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिले आहेत.
यामुळे दिले न्यायालयाने आदेश
भारत जोडो यात्रा या ट्विटर अकाऊंटवरुन कॉपीराईटच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत हे अकाऊंट ब्लॉक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या प्रमोशनल एक्टीव्हीटीसाठी हा मोठा फटका आहे. बंगळुरूतील एक वाणिज्य न्यायालयाने सोमवारी ट्विटरला महत्त्वाचे आदेश दिले. त्यामध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जनआंदोनलाचे भारत जोडो यात्रा हे ट्विटर अकाऊंट तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
एमआरटी म्युझिक कंपनीने याबाबत न्यायालयात कॉपीराईटचा दावा केला होता. त्यामध्ये, या ट्विटर अकाऊंटने अवैध पद्धतीने चित्रपट केजीएफ- २ चित्रपटातील गाण्याचा वापर केल्याचे म्हटले आहे. त्यावर, न्यायालयाने आज सुनावणी केली.