मुंबई,दि.30: गृहमंत्री अमित शाह यांचा बनावट संपादित व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अहमदाबाद सायबर क्राईम टीमने 2 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसशी संबंधित आहेत. अमित शाहांच्या दोन सभांचे व्हिडिओ एका खास अजेंड्याखाली एडीट करून व्हायरल करण्यात आले होते.
दोन्ही आरोपी काँग्रेस-आपशी संबंधित आहेत
सतीश वनसोला आणि आरबी बारिया अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. सतीश वनसोला हे काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांचे क्षेत्रीय कार्यालय (PA) सांभाळतात तर आरबी बारिया हे आम आदमी पक्षाचे दाहोद जिल्हा प्रमुख आहेत. दोघांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
अनेक नेत्यांना नोटीस
दिल्ली पोलीस या प्रकरणी वेगाने कारवाई करत असून अनेक राज्यांमध्ये त्याची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या तपासाची व्याप्ती अनेक राज्यांमध्ये पसरली आहे. संपादित व्हिडिओच्या तपासासाठी झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि नागालँडमध्ये दिल्ली पोलिसांची स्वतंत्र पथके पाठवण्यात आली आहेत. बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनाही समन्स बजावले आहे.
बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या लोकसभा उमेदवाराला नोटीस देण्यात आली असून त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. झारखंडमधील एका काँग्रेस नेत्यालाही नोटीस मिळाली आहे. चौकशीसाठी दिल्लीला बोलावले आहे. नागालँडच्या काँग्रेस नेत्यालाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
या सर्वांना सोबत मोबाईल आणण्यास सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणाचे सीएम रेड्डी यांच्यासह सहा जणांना दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. संपादित व्हिडिओ प्रकरणात अनेक राज्यांतील लोकांचा सहभाग आहे.