काँग्रेसच्या लोकसभा उमेदवाराने अर्ज घेतला मागे, भाजपात करणार प्रवेश

0

मुंबई,दि.29: मध्य प्रदेशातील इंदौर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथून पक्षाचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी अर्ज मागे घेतला आहे. तसेच अक्षय कांती काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी X वर पोस्ट करून अक्षय कांती बाम भाजपमध्ये सामील झाल्याची माहिती दिली. पोस्ट करताना कैलाश विजयवर्गीय यांनी लिहिले की, “काँग्रेसचे इंदूरचे लोकसभा उमेदवार अक्षय कांती बम यांचे भाजपमध्ये स्वागत आहे.”

मिळालेल्या माहितीनुसार ते काही वेळात अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या 35 वर्षांपासून इंदौर लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची वाट पाहणाऱ्या काँग्रेसने भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात अक्षय बम (45) या पूर्णपणे नवीन चेहऱ्याला उमेदवारी दिली होती. इंदौर मतदारसंघावर बम यांची मुख्य लढत भाजपचे विद्यमान खासदार शंकर लालवाणी (62) यांच्याशी होती. लालवानी यांनी इंदूर महानगरपालिकेचे अध्यक्ष आणि इंदूर विकास प्राधिकरणाचे (आयडीए) अध्यक्षपदही भूषवले आहे.

कोण आहेत अक्षय कांती बम?

बम हे व्यवसायाने व्यापारी असून त्यांचे कुटुंब शहरात खासगी महाविद्यालये चालवतात. ते जैन समाजाचे आहेत. इंदौर लोकसभा मतदारसंघात या समाजाचे सुमारे दोन लाख मतदार आहेत. बम यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आतापर्यंत एकही निवडणूक लढलेली नाही. बम यांनी 2023 च्या विधानसभा निवडणुकीत इंदौर-4 मतदारसंघातून तिकिटाचा दावा केला होता, परंतु काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही.

मतदारांच्या संख्येच्या बाबतीत, राज्यातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ असलेल्या इंदौरमध्ये 25.13 लाख लोक आहेत. यावेळी भाजपने आठ लाख मतांच्या फरकाने येथून विजयाचा नारा दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत इंदौरमध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता. इंदौरमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. यापूर्वी सुरतच्या जागेवरही असाच प्रकार घडला होता, जिथे भाजपचा उमेदवार बिनविरोध विजयी झाला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here