सोलापूर,दि.17: भाजपाचा उल्लेख करत काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. प्रणिती शिंदे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसापासून सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबाबत अशाच चर्चा अनेक दिवसापासून सुरू होत्या. अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपा पक्षात प्रवेश केला आहे.
काँग्रेसचे अनेक आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्याबाबतही गेल्या अनेक दिवसापासून भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. लोणावळा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस हा विचार आहे कुणीही संपवू शकत नाही, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या. काँग्रेस पक्षाचे लोणावळा येथे शिबिर सुरू आहे.
‘आपल्या रक्तात काँग्रेस आहे, आपण काँग्रेस पक्षात राहूनच भाजपाचा पराभव करणार आहोत. काँग्रेस माझा पहिला आणि शेवटचा पक्ष असेल. मी काँग्रेसी म्हणून जन्माला आले आणि मरेन पण काँग्रेसी म्हणूनच.’ असे वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केले आहे.
यापूर्वीही काँग्रेसचे नेते माजी केंद्रीयगृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले होते. देशात सध्या अफवा पसरविण्याचे काम जोरात सुरू आहे माझ्याबद्दल आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या पक्षप्रवेशाबद्दलही विनाकारण चर्चा केली गेली. विरोधकांकडून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न झाला पण माझ्या रक्तात काँग्रेस पक्ष भिनलेला आहे आणि भविष्यात याच पक्षाला चांगले दिवस येणार याचा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बोरोटी बुद्रुक (16 जानेवारी 2024 रोजी) येथे बोलताना केले होते.