संभाजीनगर नामांतरावरून काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे मोठे विधान

0

दि.8: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेने विरुद्ध बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला. तत्पूर्वी त्यांनी अनेक निर्णय घेतले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत (दि.29 जून) औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. एकीकडे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी या विरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशारा दिला आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसने या नामांतराला पाठिंबा दर्शवला आहे.

‘संभाजीनगर नावाला पाठिंबा’

या निर्णयाचा एमआयएमने विरोध केला असला तरी, काँग्रेसने मात्र याचे समर्थन केले आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी याबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी संवाद साधताना अशोक चव्हाण म्हणाले की, ‘औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांची हत्या केली होती, त्याची इतिहासातही नोंद आहे. मुद्दा इतकाच आहे की, हा विषय कोण्या एका समाजापुरता मर्यादित नाही. हा विषय संभाजी महाराजांबद्दल ज्या भावना आहेत, त्याचा आहे. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे, याला काँग्रेसचा विरोध असण्याचे कारण नाही.’

जलील काय शहराचा बादशाह आहे का? 

दरम्यान, शिवसेनेचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला. जलील म्हणाले होते की, औरंगाबादचे संभाजीनगर होऊ देणार नाही. त्यांनी काल बैठकही घेतली, असे विचारले असता शिरसाट म्हणाले, इम्तियाज जलील काय या शहराचा बादशाह आहे का? कोण इम्तियाज जलील? इथली जनता महत्वाची आहे आणि हा शिवसेना प्रमुखांचा शब्द आहे. औरंगाबादचे संभाजीनगर करणे, हा उद्धव साहेबांनी घेतलेला निर्णय आहे. संभाजीनगर हे होणारच आणि तातडीने होणार. किती जरी आडवे आलेना, तरी त्यांना आडवे करण्याची ताकद आम्ही ठेवणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here