काँग्रेसचे सरचिटणीस बिनॉय तमांग यांचे भाजपा उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन

0

कोलकाता,दि.23: लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल काँग्रेसमध्ये मोठी राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यामुळे पक्षाने पश्चिम बंगालमधील राज्य युनिटचे सरचिटणीस बिनॉय तमांग यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. तमांग यांनी दार्जिलिंग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराऐवजी भाजपा उमेदवार राजू बिस्ता यांना मतदान करण्याचे आवाहन केल्याने पक्षाने ही कारवाई केली आहे. लोकसभा निवडणुकीत दार्जिलिंगमधून भाजपचे उमेदवार राजू बिस्ता यांना पाठिंबा देणार असल्याचे बिनॉय तमांग यांनी सांगितले होते. प्रख्यात गोरखा नेते बिनॉय तमांग यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

दार्जिलिंग मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मुनीश तमांग यांच्या नावावर बिनॉय तमांग यांनी आक्षेप घेतला होता. पक्षाच्या हायकमांडने उमेदवारासाठी सल्लामसलत केली नसल्याचे ते म्हणाले होते. यानंतर आता ते म्हणाले की दार्जिलिंग लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राजू बिस्ता यांना मी पूर्ण पाठिंबा देऊ इच्छितो कारण यामुळे दार्जिलिंगच्या डोंगराळ भागातील लोकांना सुरक्षा आणि न्याय मिळेल. मी दार्जिलिंगच्या लोकांना, माझ्या समर्थकांना, मित्रांना आणि नातेवाईकांना सांगू इच्छितो की त्यांनी भाजपचे उमेदवार राजू बिस्ता यांना आपले बहुमोल मत द्यावे.  

मतदानाच्या अवघ्या 72 तासांपूर्वी बिनॉय तमांग यांनी एका व्हिडिओ संदेशात सांगितले की, ‘दार्जिलिंगमधील गोरखांना न्याय मिळावा यासाठी मी भाजपा उमेदवार राजू बिस्ता यांना पाठिंबा देत आहे. 26 एप्रिल रोजी भाजप आणि त्यांचे उमेदवार राजू बिस्ता यांना मतदान करा. केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्येही भाजपचे सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे. सिलीगुडी, डुअर्स आणि टेकड्यांमधील राजकीय आणि घटनात्मक समस्यांना न्याय देण्यासाठी मी पुढील सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचा डोंगरही संपवावा लागेल.’

पाच महिन्यांपूर्वीच काँग्रेसमध्ये केला होता प्रवेश

खरं तर, एकेकाळी गोरखा जनमुक्ती मोर्चाचे नेते आणि बिमल गुरुंगचे अनुयायी असलेले बिनॉय तमांग 2021 मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले होते. 2022 मध्ये त्यांनी तृणमूल सोडले. नोव्हेंबर 2023 मध्ये ते प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्यासोबत दिल्लीला गेले आणि काँग्रेसमध्ये दाखल झाले. ही घटना अवघ्या 5 महिन्यांपूर्वी घडली. तर दार्जिलिंगमध्ये काँग्रेसने मुनीश तमांग यांना उमेदवारी दिली आहे. मुनीश यांनी गोरखा परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिनॉय तमांग यांना दार्जिलिंगमध्ये उमेदवार व्हायचे होते. तसा प्रस्तावही काँग्रेस हायकमांडकडे पाठवण्यात आला होता. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here