सोलापूर,दि.26: संभाजी ब्रिगेडने सोलापुरात गुणरत्न सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत राडा केला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अंगावर शाईफेक करत राडा केला. सोमनाथ राऊत असं संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याचं नाव आहे.

वादग्रस्त गुणरत्न सदावर्ते हे सोलापूर दौऱ्यावर होते, त्यांनी हॉटेल बालाजी सरोवर मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. दरम्यान संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकून पत्रकार परिषद उधळून लावली.
सोलापूरमध्ये ॲड. सदावर्ते यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी सुरू होताच काही कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्यावर शाई फेक केली.
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शाईफेक करणाऱ्या व्यक्तीचं नाव सोमनाथ राऊत असून ते सोलापुरातील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहेत. शाईफेकीच्या घटनेवर ते म्हणाले की, “आज संविधान दिवस आहेत. गुणरत्न सदावर्ते हे महापुरुषांच्या या महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत. या महाराष्ट्रातला लहानातला लहान कार्यकर्ता म्हणून या गुणरत्न नव्हे तर गुणउधळे सदावर्तेचा निषेध करत आहोत. सदावर्ते यांना महाराष्ट्रात कुठेही फिरु देणार नसल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्यावतीने देण्यात आला. सोमनाथ राऊत यांनी म्हटले की, मी त्यांच्या कार्यक्रमात त्यांच्यावर शाई फेकून काळे कापड दाखवून निषेध केला आहे. सदावर्ते म्हणजे भाजपचं पिल्लू आहे. महाराष्ट्र तोडायचा असं भाजपने ठरवलेलं आहे. पण आम्ही ते शक्य होऊ देणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.
पत्रकार परिषदेतील राड्यानंतर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “आज भारतीय संविधान दिन आहे. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, संजय राऊत, बिळातले तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पिलावळींना माझ्या संवाद यात्रेने सळो की पळो केलं आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.”