आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

0
आमदार प्रणिती शिंदे

सोलापूर,दि.28: सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपाचे आमदार राम सातपुते यांच्यात दुरंगी लढत होत आहे. प्रणिती शिंदेंनी जाहीर भाषणामध्ये केलेल्या एका विधानाविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली असून प्रणिती शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाने केली आहे.

पुलवामा हल्ला केंद्र सरकारचा नियोजित कट होता, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला होता. त्यांचं हे वक्तव्य देशाची बदनामी करणारं, असल्याचं म्हणत भाजपने त्यांच्या विरोधात निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

प्रणिती शिंदेंनी विरोधकांवर टीका करताना 2019 साली पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत गंभीर दावे केले होते. पुलवामाचा हल्ला हा घडवून आणल्याचा दावा प्रणिती शिंदेंनी जाहीर भाषणात केला. यासंदर्भातील दावे सरकारमधील अधिकाऱ्यांनी केल्याचा संदर्भ त्यांनी दिला. याच विधानावर आता भाजपाने आक्षेप घेतला आहे. प्राणिती शिंदेंनी पुलवामा हल्ल्याप्रकरणी केलेलं वक्तव्य हे देशाची बदनामी करणारं होतं, असं भारतीय जनता पार्टीने म्हटलं आहे.

भाजपातर्फे तक्रारीत म्हणण्यात आलं आहे की, ”काश्मीरमध्ये पुलवामा भागात पाकिस्तानी अतिरेक्यांनी भीषण हल्ला केला होता. पुलवामाचा हा हल्ला घडला नाही तर घडविण्यात आला होता. प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनीच त्याचा गौप्यस्फोट केला होता. हे वक्त्यवं देशाची बदनामी करणारे देशद्रोही वक्तव्य आहे. जे निवडणूक नियमांची तसेच आपल्या देशाच्या सैन्याचे मनोधैर्य खचवणारे आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here