सोलापूर,दि.18: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला असून 42 सोलापूर (अनु. जाती) व 43 माढा या लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला असून जिल्ह्यात निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी तथा खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह इंडियन नॅशनल कॉग्रेसचे मनिष गडदे, नंदकुमार पवार, भारतीय जनता पार्टीचे अनिल कंदलगी, शिवसेना ठाकरे गटाचे जरगीस मुल्ला, मार्क्सवादी कम्युनिष्ट पार्टीचे नरसिंग म्हेत्रे, मोहन कोकूल, राष्ट्रवादी पार्टीचे (अजित पवार) संतोष जाधव, शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे, आम आदमी पार्टीचे खतीब वकील, बसपाचे शिलवंत काळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की प्रत्येक नागरिक, राजकीय पक्ष यांनी आदर्श आचारसंहितांचे उल्लंघन होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास आदर्श आचारसंहिता कक्षाच्या वतीने संबंधिता विरोधात तात्काळ आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, याची नोंद घ्यावी असेही त्यांनी सुचित केले.
तसेच भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जाहीर होईल, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024, मतदानाची तारीख 07 मे 2024 तर मतांची मोजणी-04 जून.2024 आणि निवडणूक प्रक्रिया दिनांक 06 जून 2024 रोजी पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदार संघ आहेत, 42 सोलापूर (अ.जा.) व 43 माढा असे दोन लोकसभा मतदार संघ आहेत. सोलापूर जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार 18 लाख 76 हजार 498, स्त्री मतदार 17 लाख 50 हजार 297 व इतर मतदार 280 असे एकूण 36 लाख 27 हजार 075 एवढे मतदार व 4 हजार 591 सैनिक मतदार आहेत. जिल्ह्याचा मतदाराची सरासरी दि 15.3.2024 रोजी 76.74% एवढा आहे. मतदारांची लिंग गुणोत्तर हा 933 आहे. जिल्ह्यामध्ये 18-19 वयोगटातील एकूण मतदार 52 हजार 783 असून 20-29 वयोगटातील मतदार हे 7 लाख 12 हजार 147 इतके आहेत. 85 वर्षावरील मतदारांची संख्या हि 54 हजार 991 असून दिव्यांग मतदार संख्या हि 27 हजार 194 इतकी आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण मुळ मतदान केंद्र 3599 (शहरी 1243 व ग्रामीण 2356) व 18 सहाय्यकारी केंद्रे अशी एकूण 3 हजार 617 मतदान केंद्रे आहेत. तसेच 3 हजार 599 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 27 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. जिल्ह्यामध्ये 50% मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. जिल्ह्यासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी एकूण 8518 बॅलेट युनिट, 4903 कंट्रोल युनिट व 5276 VVPAT इतक्या EVM ची प्रथमस्तरीय तपासणी करून त्या पोलीस बंदोबस्तात स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती
मतदान केद्रासाठी 21 हजार 310 अधिकारी व कर्मचारी, खर्चाच्या देखरेखीसाठी 805 कर्मचारी, 218 व्हिडिओग्राफरची संख्या, सूक्ष्म निरीक्षक 455, सेक्टर ऑफिसर 366, स्टॅटिक सर्व्हिलन्ससाठी 48 पथके, फ्लाइंग स्क्वॉड 46 पथके, 48 पथके व्हिडिओ पाळत ठेवण्यासाठी, व्हिडिओ पाहणाऱ्या पथकांची संख्या 13, खाते कामासाठी 11 पथके स्थापन करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
आचार संहिते बाबत काही तक्रारी असल्यास त्यासाठी C- vigil app वापरावे, तसेच cash seize करणे, liquor seize करणे तसेच इ. तत्सम कामासाठी ESMS app वापरण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी एक कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली असून तिथे 1950 हा टोल फ्री नंबर हा activate करण्यात येत आहे. या कंट्रोल रूम मधून सर्व पथकांवर नजर ठेवण्यात येणार आहे.
लोकसभा 2024 सार्वत्रिक निवडणूक यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यासाठी एक खिडकी योजना व Suvidha प्रणालीद्वारे अर्ज सादर करणेची सोय करण्यात आली आहे. तसेच निवडणूका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवार आणि राजकीय पक्षांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
42 सोलापूर व 43 माढा लोकसभा मतदार
244 करमाळा मतदार संघामध्ये 342 मतदान केंद्र असून 3 हजार 16 हजार 467 मतदार आहेत. 245 माढा मतदार संघामध्ये 341 मतदान केंद असून 3 लाख 35 हजार 342 मतदार आहेत. 246 बार्शी मतदार संघामध्ये 329 मतदान केंद्र एकूण मतदार 3 लाख 19 हजार 426 मतदार आहेत. 247 मोहोळ (अ.जा) मतदार संघामध्ये 331 मतदान केंद्र 3 लाख 17 हजार 839 मतदार आहेत. 249 सोलापूर शहर मध्ये 291 मतदान केंद्र 3 लाख 21 BB हजार 393 मतदार आहेत, 284 सोलापूर शहर उत्तर मतदार संघामध्ये 278 मतदान केंद्र 3 लाख 7 हजार 667 मतदार आहेत, 250 अक्कलकोट मतदान संघामध्ये 374 मतदान केंद्र 3 लाख 56 हजार 509 मतदार आहेत, 251 सोलापूर दक्षिण मतदार संघामध्ये 357 मतदान केंद्र 3 हजार 51 हजार 253 मतदार आहेत, 252 पंढरपूर मतदार संघामध्ये 337 मतदान केंद्र 3 हजार 54 हजार 861 मतदार आहेत, 253 सांगोला मतदार संघामध्ये 299 मतदान केंद्र 3 लाख 10 हजार 441 मतदार आहेत, 254 माळशिरस मतदार संघामध्ये 338 मतदान केंद्र तर 3 लाख 35 हजार 877 मतदार आहेत.
यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकारी मनीषा कुंभार यांनी राजकीय पक्षानी आदर्श आचारसंहिताचे पालन करण्याबाबतच्या नियमावलीची सविस्तर माहिती दिली. तर खर्च समितीच्या नोडल अधिकारी श्रीमती वाकडे यांनी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला 95 लाखापर्यंत खर्च करण्याची मर्यादा असल्याचे सांगून खर्च समितीने निवडणूक कालावधीत उमेदवाराकडून करण्यात येणाऱ्या खर्चाच्या अनुषंगाने सर्व दर तयार करून ते सर्व राजकीय पक्षांना देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. पेड न्यूज व जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण करण्याच्या अनुषंगाने माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव सुनील सोनटक्के यांनी सविस्तर माहिती दिली.
राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी एक खिडकी व विविध परवानगीच्या अनुषंगाने आपल्या समस्या मांडून प्रशासनाने त्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली. तसेच राजकीय पक्षांच्या सभा घेण्यासाठी सोलापूर शहर, जिल्ह्याचा नागरी भाग तसेच ग्रामीण भागातील शासकीय मैदाने मागणी केल्यानंतर विहित नियमावली प्रमाणे वेळेत उपलब्ध करून देण्याचे ही मागणी करण्यात आली. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आदर्श आचारसंहितेचे सर्व राजकीय पक्षाच्या वतीने पालन करण्यात येईल, असेही यावेळी सर्व प्रतिनिधींनी सांगितले.