लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले हे निर्देश

0

सोलापूर,दि.17: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्व नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी सर्व संबंधित नोडल अधिकारी यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग-ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे वाचन करावे. दिलेली जबाबदारी समजून घेऊन त्यानुसार तंतोतंत काम करावे. निवडणूक कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. तसेच सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी  असुरक्षित भागाची (Vulnerable mapping) पहिली भेट त्वरित पूर्ण करून संबंधित सेक्टर ऑफिसर व पोलीस अधिकारी यांची बैठक घ्यावी, असे त्यांनी सूचित केले.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार यांनी ज्या मतदान केंद्रावर अथवा संपूर्ण गावांमध्ये मतदान प्रक्रियेवर बहिष्कार जाहीर केलेला आहे. याबाबत निवेदन प्राप्त झाले असेल किंवा माहिती प्राप्त झाली असेल तर त्या ठिकाणी तात्काळ जाऊन संबंधित गावांतील लोकांची समजूत काढावी व बहिष्कार घालण्यापासून परावृत्त करावे तसेच त्याबाबतचा अहवाल प्रशासनाला त्वरित सादर करावा. त्याप्रमाणेच प्रत्येक विधानसभा निहाय ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम आहेत त्या स्ट्रॉंग रूमची उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता त्यांनी संयुक्त पाहणी करावी. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे स्ट्रॉंग रूम असली पाहिजे याची काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.

निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात स्वीप (SVEEP) कार्यक्रमाची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी स्वीप चे नोडल अधिकारी तसेच सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी  विविध कार्यक्रम राबवून मतदारांमध्ये जनजागृती करावी व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार तसेच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून शहरी व ग्रामीण भागात करण्यात येत असलेल्या विविध उपायोजना, मतदान केंद्रावर देण्यात येणारा पोलीस बंदोबस्त, चेक पोस्ट आदी माहिती दिली. त्याप्रमाणेच शहर व ग्रामीण भागातील खाजगी व्यक्तीकडे असलेले शस्त्रे जमा करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असल्याचेही सांगितले.

प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. तसेच मनुष्यबळ व्यवस्थापन, ईव्हीएम मॅनेजमेंट, निवडणूक प्रशिक्षण, संगणकीकरण, खर्च समिती, मिडिया सेंटर, आदर्श आचारसंहिता कक्ष अशा 16 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून आणखी 4 नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here