मुंबई,दि.२: वर्गणी काढून नवाब मलिक यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये तरी दाखल करा. जावयामुळे वेडा झालेला मलिक जगातला पहिला सासरा आहेत. अशी बोचरी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर आता मलिक विरुद्ध भाजप असा सामना सुरू झाला आहे. मलिक यांच्या या आरोपानंतर आता भाजपचे नेते मलिकांवर निशाणा साधू लागले आहेत.
आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मलिकांवर निशाणा साधला आहे. भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, नबाब मलिक रोज डोक्यात वारा शिरल्यासारखं बरळतायत. हाती पुरावे असतील तर कोर्टात जा की?, नाही तर वर्गणी काढून यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये तरी दाखल करा. इतकेच नाही, तर नवाब मलिक हा जावयामुळे वेडा झालेला जगातला पहिला सासरा असल्याची खोचक टीकाही भातखळकर यांनी केली आहे.
भातखळकर यांनी शिवसेनेते खासदार संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. बाळासाहेब ठाकरे असोत, उद्धव ठाकरे असोत किंवा मग शरद पवार असोत, आमच्या नेत्यांनी आम्हाला राजकारणात पातळी ओलांडायची नाही हे शिकवलं आहे, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. याच वक्तव्यावर भातखळकर यांनी टिप्पणी केली आहे. संजय राऊत हा माणूस एकमद भला आहे, प्रॉब्लेम एकच, कधीच खरं बोलत नाहीत, अशी खोचक टीका भातखळकर यांनी राऊत यांच्यावर केली आहे.