सोलापूर,दि.7: CNG गॅसचे सर्वाधिक दर सोलापुरात आहेत. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक महाग CNG गॅस सोलापुरात आहे. गेल्या महिनाभरात सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) तसेच एलपीजी (LPG) गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सध्या सीएनजीचा दर 76 प्रति किलो आहे. महानगर गॅस लिमिटेडने 29 एप्रिल रोजी मुंबई आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या (CNG) किमतीत 4 रुपये प्रति किलोने वाढ केली होती. यानंतर मुंबईत सीएनजीचा दर 76 रुपये किलोवर गेला. याआधी 12 एप्रिल रोजीही महाराष्ट्रात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. आणि त्याआधी 6 एप्रिल रोजी महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली होती.
सोलापूरमध्ये सीएनजी दर जास्त
सोलापुरात सीएनजीच्या दरात मोठी वाढ़ झालीय. सोलापूरमध्ये सीएनजीचे दर 95 रुपयांवर पोहोचले आहेत. महिन्याभरात जवळपास 12 ते 15 रुपयांनी सीएनजीचे दर वाढल्याने ग्राहकांमधून नाराजीचा सुर उमटतोय. मागील काही दिवसांपूर्वी सोलापुरात सीएनजीचा दर 81 रुपये इतका होता. मागील महिन्यात सीएनजीच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ झाली होती.
या आठवड्यात सीएनजीच्या दरात तब्बल 11 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सोलापुरात सीएनजीचे दर 95.59 रुपये किलोवर पोहोचला आहे. आधी सोलापुरात पुण्याहून इंधन पुरवठा व्हायचा, त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढल्याने सोलापुरात सीएनजीचे दर वाढले होते. मात्र आता सोलापुरातून डिलर्सना इंधनाचा पुरवठा होऊनही सीएनजीचे दर वाढतानाच दिसत आहेत. यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सोलापुरात देवदर्शनासाठी पुण्यामुंबईहून अनेक नागरिक येत असतात. पुण्यामुंबईच्या तुलनेत सोलापुरात सीएनजीचे दर खूप जास्त असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. तसेच सोलापुरात व्यावसायिक गाडी चालकांना देखील या वाढीव दरामुळे मोठा फटका बसतोय.
दिल्लीत सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 2.5 रुपये आणि पीएनजीच्या किमतीत 4.25 रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. दरम्यान, दिल्ली आणि आसपासच्या भागात याआधी 14 एप्रिल रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यापूर्वी 7 एप्रिल रोजी सीएनजीच्या दरात किलोमागे 2.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडकडून ही दरवाढ करण्यात आली होती. यापूर्वी 6 आणि 4 एप्रिललाही देशाची राजधानी दिल्लीत सीएनजीच्या किमतीत प्रत्येकी 2.50 रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली होती. गुजरात गॅसनेही 6 एप्रिल रोजी सीएनजीचे दर 6.5 रुपये प्रति किलो दराने वाढवले होते. त्यानंतर गुजरातमधील सीएनजीचे दर 76.98 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. 1 एप्रिल रोजी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने दिल्ली आणि जवळच्या भागात सीएनजीच्या दरात प्रति किलो 80 पैशांनी वाढ केली होती. यावेळी, पीएनजीच्या किंमतीतही प्रति किलो 5.85 रुपये दराने वाढ झाली आहे.