मुंबई,दि.11: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का देण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्याबरोबर शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार गेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदार आहेत, यानंतर आता 13 वा खासदारही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेना खासदार गजानन किर्तीकर हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
गजानन किर्तीकर कोण आहेत?
गजानन किर्तीकर हे मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार आहेत, तसंच ते शिवसेनेचे जुने जाणते नेते आणि बाळासाहेब ठाकरेंचे सहकारीही आहेत.
याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गजानन किर्तीकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. गजानन किर्तीकरही मागच्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराज असल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादी-काँग्रेससोबत युती नको, अशी मागणी गजानन किर्तीकर यांनी उघडपणे केली होती.
जून महिन्यामध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदार आणि 10 अपक्ष आमदारांच्या मदतीने उद्धव ठाकरेंना धक्का दिला. एकनाथ शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर आणखी काही आमदार आणि खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा वारंवार केला जात आहे.