Mandya Karnataka: गणपती मिरवणुकीदरम्यान दगडफेक आणि जाळपोळ

0

मुंबई,दि.12: गणपती मिरवणुकीदरम्यान दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. कर्नाटकातील मंड्यामध्ये (Clashes in Mandya Karnataka) गणेश विसर्जनाच्या वेळी जातीय हिंसाचार झाला आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली की, दगडफेक करून दंगेखोरांनी अनेक दुकाने आणि कपड्यांची तसेच दुचाकी शोरूमला आग लावली. एवढेच नाही तर बेकायदा जमावाने रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीही जाळल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

Clashes in Mandya Karnataka

वास्तविक, बदरीकोप्पलू गावातील तरुण गणेश विसर्जनासाठी मिरवणूक काढत होते. ही मिरवणूक नागमंगला मुख्य मार्गावरील मशिदीजवळून गेली. यादरम्यान मिरवणुकीवर दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती चिघळली आणि दोन समुदायांमध्ये हाणामारी सुरू झाली. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यावर संतप्त हिंदू समाजाच्या लोकांनी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करत दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाने आज नागमंगला बंदची हाक दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी 52 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर अटक केलेल्यांचे नातेवाईक पोलिस ठाण्यासमोर जमा झाले आणि त्यांच्या सुटकेची मागणी करू लागले. ते म्हणाले, ‘आमच्या लोकांनी काहीही चुकीचे केले नाही, त्यांना विनाकारण अटक करण्यात आली आहे.’ यावेळी महिलांनी पोलिसांसमोर अश्रू ढाळले, त्यानंतर पोलिसांनी महिलांना कायदेशीर सल्ला दिला. सर्वांना चौकशीसाठी आणण्यात आले असून, जो कोणी निर्दोष असेल त्याला सोडण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेनंतर मंड्याचे एसपी मल्लिकार्जुन बलदंडी यांचे वक्तव्य समोर आले आहे. एसपी म्हणाले की, गणेश मिरवणूक मशिदीजवळ पोहोचल्यावर तिथून मिरवणूक निघायला थोडा वेळ लागला. त्यावरून दोन्ही समाजात वादावादी सुरू झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. लाठीचार्ज केल्यानंतर लोकांनी पोलिस ठाण्यासमोर जाऊन निदर्शने केली. इतर समाजातील लोकही मोठ्या संख्येने जमा झाले आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. त्यांनी काही दुचाकी आणि रस्त्याच्या कडेला असलेली दुकानेही पेटवून दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here