चित्रा वाघ यांनी शेअर केला नाना पटोले यांचा व्हिडिओ, नानांनी दिले स्पष्टीकरण

0

मुंबई,दि.20: भारतीय जनता पार्टीच्या (BJP) प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा व्हिडिओ शेअर करत, “काय नाना – – तुम्ही पण” असे ट्विट केले आहे. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ यांनी व्हिडीओ शेअर करत नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

या व्हिडीओमध्ये महिलेसोबत दिसत असलेली व्यक्ती ही नाना पटोले हेच असल्याचा दावा करत चित्रा वाघ यांनी तो नाना पटोले यांना टॅग केला आहे. तसेच काय नाना, तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटिलात? असा खोचक प्रश्न विचारला आहे. या व्हिडिओबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही. मात्र, नाना पटोले यांनी आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे.  

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओप्रकरणी बोलताना नाना पटोले यांनी आपली बाजू मांडली. मला बदनाम करण्याचं कारस्थान असून याबाबत व्हिडिओची तपासणी करुन आमच्याकडून कायदेशीर बाजू मांडण्यात येईल. ”मी सध्या पूराच्या दौऱ्यामध्ये आहे, पण राजकारणाची पातळी जी खाली उतरलीय त्याचा हा परिणाम आहे.

लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना बदनाम करण्याची ही प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात आमची लीगल टीम कार्यवाही करणार आहे,” असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. तसेच, चित्रा वाघ यांच्याबद्दल बोलताना मला त्या ताईंबद्दल काहीही बोलायचं नाही, संजय राठोडांबाबत त्यांनी काय केलं. आमच्या प्रकरणात काय घडलंय ते आमची लीगल टीम पाहातेय, उद्या ते सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. 

भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्विट करत यााबाबत सवाल उपस्थित केले आहेत. याबाबत चित्रा वाघ म्हणाल्या की, माझ्याकडे हा व्हिडीओ आला तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं? तो व्हिडीओ मी पुन्हा एकदा चेक केला. तो बऱ्याच ठिकाणी व्हायरल झालेला आहे. तो व्हिडीओ सामान्य व्यक्तीचा नाही, तर तो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मी ट्विट करत नानांनाच विचारलं आहे. मात्र त्यांच्याकडून या व्हिडीओबाबत अद्याप काही उत्तर आलेलं नाही, असेही वाघ यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here