बीजिंग,दि.१२ः चीनमधील तिबेट एअरलाइन्सच्या विमानामध्ये (Tibet Airlines plane) गुरुवारी आग लागली. विमानाच्या टेक ऑफ दरम्यान हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाचे नियंत्रण सुटले आणि धावपट्टीच्या खाली विमान गेले. चोंगकिंग (Chongqing) विमानतळावर सकाळी हा अपघात झाला. तेथील माध्यमांनी सांगितले की, 25 प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवासी विमानात 113 प्रवासी होते आणि 9 क्रू मेंबर्स होते.
विमानातील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या घटनेच्या व्हिडिओ फुटेजमध्ये चोंगकिंग जिआंगबेई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिबेट एअरलाइन्सच्या विमानाच्या समोरून ज्वाला उठताना दिसत आहेत.
यासोबतच विमानातून धूरही निघताना दिसत आहे. मागच्या दारातून इव्हॅक्युएशन स्लाइडमधून बाहेर पडल्यानंतर लोक विमानातून पळताना दिसतात. मात्र, आग विझवण्यात आली असून धावपट्टी बंद करण्यात आली आहे.