दि.२८: टी २० भारत पाक मॅच २४ ऑक्टोंबरला झाली. या सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवल्यानंतर देशातील काश्मिर, पंजाब, उत्तर प्रदेशसहीत काही राज्यांत फटाके फोडून घोषणाबाजी करण्यात आल्याचं समोर आलं होतं. यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका घोषणेची देशात चर्चा सुरू झालीय. भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या टी २० सामन्यात भारताच्या पराभवानंतर फटाके फोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केलीय.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष साजरा करत फटाके फोडणाऱ्यांविरोधात ‘देशद्रोहा’चा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात जवळपास सहा जणांवर आधीच गुन्हे दाखल केले आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर या आरोपींवर आता ‘देशद्रोहा’चा गुन्हाही दाखल केला जाणार आहे. देशाविरुद्ध कोणताीही घटना घडली तर त्याबाबत ताबडतोब देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जावा असे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पाकिस्तानने सामना जिंकल्यानंतर उत्तर प्रदेशसहीत काही राज्यांत फटाके फोडून घोषणाबाजी करण्यात आल्याचं समोर आलं होतं. ही घटना राज्य सरकारनं गंभीरतेनं हाताळण्याचा निर्णय घेतलाय. अशा लोकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत असल्याचं उत्तर प्रदेशचे डीजीपी मुकुल गोयल यांनी म्हटलंय.