मुंबई,दि.16: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची माफी मागितली आहे. कालच (दि.15) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळात अनेकांना मंत्रीपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अशातच रामदास आठवले यांना मंत्रिमंडळ शपथविधीला निमंत्रण देण्यात आले नव्हते. आठवले यांनी याबाबत नाराजी बोलून दाखवली होती.
देवेंद्र फडणवीस यांनी आरपीआय पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे सांगितले होते पण प्रत्यक्षात मात्र असे झाले नसल्याची खंत आठवले यांनी बोलून दाखवली होती. तसेच आपल्याला मंत्रिमंडळ शपथविधीला देखील आमंत्रित न केल्याचे त्यांनी बोलून दाखवले होते. यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे कोणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. सुधीर मुनगंटीवार आणि इतरांची मंत्रीपदावरुन कोणतीही नाराजी नाही. असे बावनकुळे म्हणाले. मी रामदास आठवले यांची माफी मागतो. त्यांना गडबडीत मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण वेळेत पोहचले नाही. आमच्याकडुन चूक झाली असल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले.