थंडीचा कडाका वाढणार, महाराष्ट्रासह ‘या’ भागात पावसाची शक्यता

0

मुंबई,दि.12: महाराष्ट्रासह दक्षिण भारतात आज पावसाची शक्यता आहे. तर उत्तर भारतात थंडी वाढण्याची शक्यता आहे. देशभरात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. पुढील 48 तासांत देशातील विविध भागात पावसाची रिमझीम पाहायला मिळणार आहे. मिचॉन्ग चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असला तरी पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. उत्तर भारतात थंडी वाढताना दिसत आहे. तर दक्षिण भारतात पुढील 24 तासांत मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्वेकडील भागात धुक्याची चादर पाहायला मिळणार असून तापमानातही घट झाल्याचं पाहायला मिळेल.

थंडीची लाट

उत्तर भारतात येत्या काही दिवसात तापमानात घट होईल. 15 डिसेंबरपासून थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये आज धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे. आयएमडीने सिक्किममध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. बिहार, राजस्थान, झारखंड भागात पारा घसरणार आहे. दिल्लीमध्येही आठवडाभर धुके आणि थंडी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

‘या’ भागात पावसाची शक्यता

आज दक्षिण भारतात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप भागात हलका ते मध्य स्वरुपाचा पाऊस पाहायला मिळेल. यासोबतच नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातही पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भ आणि कोकणात रिमझिम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून काही भागात ईशान्य मान्सूनचा जोर वाढत होता. केरळसह दक्षिणेकडील भागांमध्ये आणखी दोन दिवस मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाडज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशाच्या उर्वरित भागात बहुतेक हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. हवामानातील बदल पाहता नागरिकांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. तापमानात घट झाल्यामुळे खोकला, सर्दी, ताप यासारख्या समस्या उद्भवू शकतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here