महाराष्ट्रातील या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता

0

मुंबई,दि.23: महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रात पडणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात एप्रिल महिना वादळी पावसात गेल्याचे दिसून येत आहे. मागच्या तीन आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पुढचे दोन दिवस पुन्हा पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातही तुरळक पाऊस असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता

वादळी पाऊस होत असल्याने राज्यातील काही भागात तापमान कमी झाले असले तरी उन्हाच्या झळा मात्र असह्य होत आहेत. राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस, गारपिटीने हजेरी लावली आहे. आज (दि. 23) विदर्भात वादळी पावसाचा इशारा कायम आहे. उद्यापासून (दि. 24) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विदर्भात वादळी पाऊस गारांमुळे वातावरणात बदल झाल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील काही जिल्ह्याचे तापमान 40 अंशांच्या पुढे होते ते तापमान सध्या 40 च्या आत आले आहे. परंतु मराठवाड्यातील महत्वाचे शहर असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मात्र राज्यातील उच्चांकी 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरीत राज्यात कमाल तापमान 35 ते 40 अंशांच्या दरम्यान आहे.

राज्यात सरासरी तापमानात वाढ होत असल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. मराठवाड्यातील माहूर आणि किनवट तालुक्यात, यवतमाळ जिल्ह्यातील पूसद, महागाव तालुक्यांत गारपीट झाली. वायव्य मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे.

मध्य प्रदेशापासून, महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे. आज (दि.23) विदर्भात वादळी पावसाचा इशारा आहे. तर उद्यापासून (ता. 24) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

नागपूर शहरात शनिवारी दुपारी पुन्हा जोरदार पाऊस झाला. काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसात गारा पडल्या. दोन दिवसांत सुमारे पन्नास झाडे पडल्याने व काही ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला.

पुढील तीन-चार दिवस नागपूर, चंद्रपूर, वर्ध्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, पावसामुळे 42 अंशावर गेलेला विदर्भातील पारा या आठवड्यात सरासरी तीन-चार अंशाने खाली आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here