सकल मराठातर्फे आजपासून सोलापूर जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन

0

सोलापूर,दि.२४: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे सगेसोयरे हा शब्द अध्यादेशात समावेश करून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावीत, तसेच आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घेण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्यावतीने २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान जिल्हाभर दररोज सकाळी साडेदहा ते दुपारी एक यावेळेत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक माउली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी बारावीच्या परिक्षेमुळे 24 तारखेचा रस्ता रोको आहे त्यामध्ये 11 ते 1 असा बदल करावा. असे आवाहन केले आहे.

या आंदोलनास आज (शनिवारी) सकाळी अकरा ते एक या वेळेत देगाव रोड मरीआई चौक येथे प्रारंभ होणार असून जिल्ह्यातील ११ तालुक्यात एकाचवेळी दररोज वेगवेगळ्या ठिकाणी हे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्या-त्या गावा शेजारून जाणारा हमरस्ता, राज्यमार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी हे आंदोलन होईल. सध्या बारावीच्या परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी ही वेळ ठरवण्यात आल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

१ मार्च रोजी वयोवृध्दही अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर उपोषणाला बसणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात आंदोलनाचा शेवट ३ मार्च रोजी मोहोळ येथे महामार्ग अडवून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी नवीन निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना देण्यात येणार आहे.

सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा अन्यथा त्या पक्षांवर राजकीय बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशाराही पवार यांनी दिला. या आंदोलनाला जे लोकप्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांना भेटून ओबीसीमधून मराठा आरक्षणाला पाठिंबा देतील, त्यांनाच मराठा समाज भविष्यात त्यांच्या पाठीशी राहील.

या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, राजन जाधव, प्रा. गणेश देशमुख, माजी नगरसेवक विनोद भोसले, रवी मोहिते, महादेव गवळी आदी उपस्थित होते.

या ठिकाणी होणार आंदोलन

सोलापूर शहरात आज (शनिवारी) सकाळी साडेदहा वाजता मरीआई चौक येथून या आंदोलनास सुरुवात होणार आहे. त्यानंतर २५ रोजी आसरा चौक, २६ रोजी मार्केट यार्ड चौक, २७ रोजी तुळजापूर रोड ऑर्किड कॉलेज येथे आणि शेवटी २८ फेब्रुवारी रोजी अक्कलकोट रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, असे समन्वयक माउली पवार यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here