Manish Sisodia: CBI चा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या घरावर छापा

0

नवी दिल्ली,दि.19: CBIने (सीबीआय) राजधानी दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे. येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरासहित 21 ठिकाणी छापेमारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लाल किल्ल्यावरुन देशातील भ्रष्टाचारासंदर्भात बोलताना एकप्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचं समर्थनच केलं होतं. त्यानंतर, 4 दिवसांतच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरावर सीबीआयने धाड टाकली आहे. यासंदर्भात स्वत: सिसोदिया यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच, सीबीआयच्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी ट्विटवरुन सांगितलं आहे.

देशात सध्या ईड, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत. या धाडीत अनेक राजकीय मंडळींचा समावेश दिसून येत आहे. गत महिन्यात प. बंगालमध्ये पार्थ चॅटर्जींच्या संपत्तीवर धाड टाकल्यानंतर महाराष्ट्रातही ईडीने खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. त्यानंतर, आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरावर सीबीआयची रेड पडली आहे. सिसोदिया यांनी ट्विट करुन सीबीआयचं स्वागत केलं आहे. 

“सीबीआय आलेली असून त्यांचे स्वागत आहे. आम्ही ईमानदार आहोत. लाखो मुलांच्या भविष्य उभारणीचे काम आम्ही करत आहोत. जो चांगले काम करतो त्याला असाच त्रास दिला जातो. आपल्या देशाचे हे दुर्देव आहे. याच कारणामुळे आपल देश प्रथम क्रमांकावर नाही,” असे ट्वीट करत मनिष सिसोदिया यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.

तसेच, “सत्य लवकर समोर यावे म्हणून आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करू. माझ्यावर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. या कारवाईतूनही काहीही समोर येणार नाही. चांगले शिक्षण देण्याच्या आमच्या प्रयत्नांना कोणीही रोखू शकत नाही,” असे देखील सिसोदिया म्हणाले.

सिसोदिया यांच्याविरोधातील या कारवाईवर अरविंद केजरीवाल यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “दिल्लीमधील शिक्षण आणि आरोग्य सवेवर होत असलेल्या कामाची दखल जगभरात घेतली जात आहे. या कामाला यांना थांबवायचे आहे. याच कारणामुळे आरोग्य आणि शिक्षणमंत्र्यांच्या घरावर छापेमारी करण्यात येत आहे. ७५ वर्षातील सर्व चांगल्या कामांना थांबवण्याचे काम करण्यात येत आहे. याच कारणामुळे भारत पिछाडीवर आहे,” अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here