Mohammad Azharuddin: भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवर गुन्हा दाखल

0

नवी दिल्ली,दि.२०: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवर (Mohammad Azharuddin) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचारप्रकरणी भारताचा माजी कर्णधार अडचणीत सापडल्याचे दिसते. विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर टीम इंडियाची कमान सांभाळणाऱ्या अझरुद्दीनवर भ्रष्टाचाराचा हा डाग हैदराबाद क्रिकेट असोसिएशनशी संबंधित आहे.

खरं तर मागील काही काळात अझरुद्दीनने एचसीए म्हणजेच हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून कारभार सांभाळला आहे. त्याने त्याच्या कार्यकाळात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, अझरुद्दीनने आपल्यावरील आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या सीईओने अझरुद्दीनविरोधात उप्पल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत अझहर आणि इतर काही माजी अधिकार्‍यांवर HCA मध्ये काम करताना त्यांच्या पदाचा आणि पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतु, या संपूर्ण प्रकरणाबाबत अझहरला विचारले असता त्याने हे आरोप फेटाळून लावले आणि आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे नमूद केले.

अझरुद्दीनने आरोप फेटाळले

भारताच्या माजी कर्णधाराने आपल्यावरील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळले आणि या संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्याने म्हटले की, मी मीडिया रिपोर्ट्स पाहिले आहेत. हे आरोप म्हणजे माझ्या प्रतिमेला डाग लावण्याचा प्रयत्न आहे. योग्य वेळ आल्यावर मी याविरोधात आवाज उठवीन आणि माझ्यावरील आरोपांना चोख उत्तर देईन. दरम्यान, अझहरवरील आरोप हे पैशांचे व्यवहार, अत्यावश्यक उपकरणांची खरेदी-विक्री आणि मालमत्तेचा गैरवापर करण्याशी संबंधित आहेत. मात्र, सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here