Politics: भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश; पक्षप्रवेशाला भाजपाचा विरोध

0

मुंबई,दि.१४: Politics: शिवसेना नेते (ठाकरे गट) सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. भूषण देसाई यांचे राजकीय अस्तित्त्व फार मोठे नसले तरी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंशी निष्ठावंत असलेल्या नेत्याच्या मुलालाच आपल्या गटात ओढून पर्सेप्शनच्या लढाईत बाजी मारल्याचे चित्र आहे. मात्र, शिंदे गटाच्या या राजकीय मोर्चेबांधणीमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून खो घातला जाण्याची शक्यता आहे. कारण, भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला गोरेगावमधील भाजपच्या नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. शिवसेना आणि भाजप हे मित्रपक्ष आहेत. भूषण देसाई यांना शिंदे गटात घेण्याची एक चूक दोन्ही पक्षांना भारी पडू शकते, असा इशारा भाजपच्या (BJP) नेत्यांकडून देण्यात आला आहे.

पत्र पाठवून विरोध | Politics

भाजपचे गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना एक पत्र पाठवले आहे. यामध्ये भूषण देसाई यांना शिवसेनेत प्रवेश देण्याने राजकीयदृष्ट्या कशाप्रकारे नुकसान होऊ शकते, हे सांगण्याचा प्रयत्न संदीप जाधव यांनी केला आहे. भूषण देसाई यांना कोणत्यातरी आर्थिक गैरव्यवहरात अडकण्याची भीती आहे. त्यापासून वाचण्यासाठीच भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. अशाप्रकारच्या भ्रष्ट आणि मलीन चारित्र्याच्या व्यक्तीला राजकीय आश्रय दिल्यास गोरेगावकरांच्या मनात संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. शिवसेना आणि भाजप यांची युती आहे. मित्राची एक चूक राजकीयदृष्ट्या दोन्ही पक्षांना महागात पडू शकते, असे संदीप जाधव यांनी पत्रात म्हटले आहे.

सुभाष देसाई यांनी अनेक वर्षे गोरेगाव पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ते तीनवेळा या मतदारसंघातून निवडून विधानसभेवर गेले होते. परंतु, २०१४ मध्ये भाजपच्या विद्या ठाकूर यांनी सुभाष देसाई यांना गोरेगावमध्ये पराभवाचा धक्का दिला होता. तर २०१९ मध्ये सुभाष देसाई यांनी विधानसभा निवडणूक लढवली नव्हती. या काळात सुभाष देसाई यांचे विधानपरिषदेत राजकीय पुनर्वसन करण्यात आले होते. आगामी काळात शिंदे गटाकडून गोरेगाव मतदारसंघावर पुन्हा दावा सांगितला जाऊ शकतो. त्यासाठी भूषण देसाई यांना पुढे केले जाऊ शकते. हीच शक्यता ओळखून गोरेगावमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी भूषण देसाई यांना विरोध करण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून भाजप गोरेगावमध्ये कोणत्याही परिस्थितीत भूषण देसाई यांना पाठिंबा किंवा मदत देणार नाही, असा स्पष्ट संदेश स्थानिक नेत्यांकडून देण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here