पुणे,दि.२६: वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी भाजपा पदाधिकारी प्रमोद कोंढरे (Pramod Kondhare) यांना पोलिसांनी अटक केली आहे. भाजपचा पुण्यातील शहर महामंत्री प्रमोद कोंढरे याच्यावर एका महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढरे यांच्याविरुद्ध फरासखाना पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी बंदोबस्तात असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
फरासखाना पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील प्रस्तावित भुयारी मार्गाच्या पाहणीसाठी नितीन गडकरी 23 जूनला पुण्यात आले होते. या कार्यक्रमापूर्वी सकाळी दहाच्या सुमारास भाजपचे आमदार हेमंत रासने कार्यकर्त्यांसोबत कसबा पेठ चौकी परिसरातील उपाहारगृहात चहा प्यायला गेले. त्यावेळी उपस्थित असलेल्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याशेजारी उभे असताना कोंढरे यांनी अश्लील वर्तन केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.








