लखनऊ,दि.12:उत्तर प्रदेशातील देवरिया येथील भाजपा आमदार शलभ मणि त्रिपाठी (Shalabh Mani Tripathi) यांनी पोलिस स्टेशनच्या आतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये काही तरुणांना पोलिस रांगेत उभे करून मारहाण करत आहेत.
उत्तर प्रदेशातील देवरिया येथील भाजप आमदार शलभ मणि त्रिपाठी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस काही तरुणांना रांगेत उभे करून लाठीमार करताना दिसत आहे. भाजप आमदाराने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- “दंगेखोरांना त्यांच्या भेटवस्तू परत!!”
आमदार शलभ मणी त्रिपाठी हे माजी पत्रकार असून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार राहिले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये हा व्हिडिओ कुठला आहे आणि मारहाण केलेली व्यक्ती कोण आहे हे सांगितले नाही. पण असे मानले जाते की यूपीच्या 9 शहरांमध्ये प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर हिंसाचार करणाऱ्या आरोपींना पोलीस मारहाण करत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून यूपी पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी सहारनपूरमधील एका पोलिस स्टेशनमध्ये शूट करण्यात आला होता, जिथे भाजपच्या दोन माजी प्रवक्त्यांद्वारे प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर निदर्शने आणि संघर्ष सुरू झाला.