मुंबई,दि.१७: विरोधी पक्षनेते वारंवार भाजपावर आरोप करत आहेत. ज्या नेत्याची चौकशी सुरू होते, त्याने भाजपात प्रवेश केल्यानंतर त्याची चौकशी थांबते. आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरून येते. त्यामुळे आमच्याकडे जो येईल तो साफ होईल, असे विधानपरिषदेत भाजपा आमदार रमेश पाटील यांनी सांगितले. ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. नेमका हाच विषय काढत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे.
आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे: आमदार रमेश पाटील
अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सरकारी योजनांचे कौतुक करताना रमेश पाटील यांनी भूषण देसाई यांचा विषय काढला. ते म्हणाले, कोणी तरी म्हणाले भूषण देसाई यांची एमआयडीसीची ४०० कोटींची फाइल आहे म्हणून ते आले. मात्र म्हणून ते आलेले नाहीत तर हे सरकार चांगले काम करते आणि न्याय देते म्हणून ते इथे आले आहेत. आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरून येते. त्यामुळे आमच्याकडे जो माणूस येईल तो स्वच्छ होणार आहे आणि हे खरे आहे.
तेलंगणात अमित शाह यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तेलंगणात आले होते. शाह तेलंगणात आल्यावर बीआरएसने त्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलं. केसीआर यांच्या या पक्षाने थेट निरमा वाशिंग पावडरच्या जाहिरातीच्या थीमवर शाह यांचं स्वागत केलं होते. या पोस्टरवर निरमा वॉशिंग पावडरची जाहिरात करण्यात आली होती. त्यावर भाजपमधील भ्रष्टाचारी नेत्यांची नावे लिहिली होती. आणि वेलकम टू अमित शाह… असं म्हटलं होते. हे पोस्टर तेलंगणात चर्चेचा विषय ठरलं होते.