भाजप आमदाराने केला खळबळजनक दावा, आमदार तानाजी सावंत यांनी व्यक्त केली होती नाराजी

0

दि.30: भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी खळबळजनक दावा केला आहे. नुकतेच सोलापूरात शिवसेना आमदार तानाजी सावंत (Shivsena MLA Tanaji Sawant) यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर नाराजी व्यक्त करत टीका केली होती. निधी वाटपावरून महाविकास आघाडीत खदखद कायम असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी जाहीर कार्यक्रमात बोलताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. एवढच नाही तर “आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय.” असंही तानाजी सावंत यांनी बोलून दाखवलं होते.

शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या नंतर आता भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (MLA Chandrashekhar Bawankule) यांनी एक मोठा दावा केला आहे. विकास कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली असल्याने सत्ताधारी काँग्रेससह शिवसेनेचे 90 टक्के आमदार नाराज असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या मुंबई कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापनेसाठी तिन्ही पक्ष एकत्र आले. परंतु त्यांच्यातील अंतर्गत वाद अजून कायम आहेत. शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांची कामे खोळंबली असल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत 100 जागा निवडून येतील असा अंदाज याच नाराजीच्या भरवशावर जाहीर केला. शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आमदारांची नाराजीच त्यांना फायद्याची ठरणार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला माहिती असल्याचा टोला देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या अधिवेशनात जाहीर झालेला अर्थसंकल्प केवळ कमिशन लाटण्याच्या हेतूने बनविण्यात आला असून, त्याचा सामान्यांना जराही फायदा नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थसंकल्पातही स्वतःच्या पक्षातील आमदारांना खूष ठेवल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here