मुंबई,दि.१५: अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात भाजपा आमदाराला दोषी ठरवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे भाजपा आमदार रामदुलार गोंड यांना एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे गोंड यांची आमदारकी जाऊ शकते. ते सोनभद्र जिल्ह्यातील दुद्धी मतदारसंघाचे आमदार आहेत. बलात्कार, तसेच धमकी दिल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत २०१४ साली गुन्हा दाखल झाला होता.
काय आहे प्रकरण?
बलात्काराचे हे प्रकरण २०१४ सालातील आहे. त्यावेळी रामदुलार गोंड यांच्या पत्नी सूर्तन देवी त्यांच्या गावाच्या सरपंच होत्या. ४ नोव्हेंबर २०१४ रोजी एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या भावाकडे रामदुलार यांच्याविषयी तक्रार केली होती. गेल्या वर्षाभरापासून रामदुलार गोंड हे माझ्यावर अत्याचार करीत आहेत, असे या मुलीने सांगितले होते. त्यानंतर रामदुलार यांच्याविरोधात सोनभद्रा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आयपीसीच्या कलम ३७६ (बलात्कार), ५०६ (धमकी), तसेच पोक्सो कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनेक वर्षांपासून या खटल्यावर सुनावणी सुरू होती.
विजय सिंह यांच्यासाठी काम करायचे
नऊ वर्षे चाललेल्या या खटल्यात न्यायालयाने वेगवेगळे पुरावे तपासले. त्यानंतर रामदुलार हे बलात्काराच्या आरोपात दोषी आहेत, असा निकाल दिला. ५१ वर्षीय रामदुलार हे अगोदर सात वेळा आमदार राहिलेल्या, तसेच माजी मंत्री विजय सिंह गोंड यांच्यासाठी राजकीय रणनीती आखण्याचे काम करायचे. विजय सध्या समाजवादी पक्षात आहेत. ते अगोदर काँग्रेस, तसेच बीएसपीचेही सदस्य होते.
गुन्ह्यानंतर मतभेद
दुद्धी मतदारसंघातील समाजवादी पार्टीच्या एका नेत्याने रामदुलार यांच्याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. “रामदुलार हे अगोदर विजय यांच्यासाठी काम करायचे. ते त्यांच्या निवडणूक प्रचाराचे नियोजन करायचे. तसेच ते विजय यांची अन्य कामेदेखील करायचे. रामदुलार यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर विजय आणि रामदुलार यांच्यात मतभेद निर्माण झाले. २०१८ साली विजय यांनी रामदुलार यांना दूर केले. रामदुलार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक वर्षांत रामदुलार यांची राजकीय प्रगती झाली. २०२२ साली त्यांना भाजपाने दुद्धी या मतदारसंघातू तिकीट दिले,” अशी माहिती सपाच्या नेत्याने दिली.
२०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीत रामदुलार यांनी विजय यांच्याविरोधात निवडणूक लढवून, त्यांचा ६,२९७ मतांनी पराभव केला होता. उत्तर प्रदेशमध्ये गोंड समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडतो. या प्रवर्गासाठी दुद्धी मतदारसंघासह एकूण दोन जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. दुद्धी मतदारसंघात एकूण ६० टक्के मतदार हे आदिवासी आहेत.
… म्हणून भाजपाने दिले तिकीट
रामदुलार यांच्याविषयी दुद्धी मतदारसंघातील एका भाजपाच्या नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “रामदुलार हे गोंड जातीतून येत असल्यामुळे त्यांना पक्षाने तिकीट दिले होते. तसेच निवडणुकीत कशा प्रकारे प्रचार करायचा असतो, निवडणूक कशी हाताळायची असते याचा त्यांना अनुभव होता. म्हणूनच त्यांना तिकीट दिले होते,” असे या नेत्याने सांगितले.
रामदुलार यांना राजकारणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचाही पाठिंबा लाभलेला आहे. “रामदुलार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य नव्हते. तरीदेखील सोनभद्र येथील संघातील नेत्यांचा त्यांना पाठिंबा असायचा,” असे भाजपातील एका नेत्याने सांगितले.