करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय ED वाले घरी आले की सोबत घेऊनच जातात

0

मुंबई,दि.३१: पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथक रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झालं. दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी होईल. यात त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. याशिवाय घराची झडतीही घेतली जाण्याची शक्यता आहे. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी मी शिवसेना सोडणार नाही, असं वक्तव्य केलंय. त्यांचं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आहे.

“कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे.” असे ट्विट संजय राऊत यांनी केले होते. यावर, “संजय राऊत हे स्पष्टोक्ते आहेत, माझे चांगले मित्र आहेत पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ न घेता शरद पवारांची शपथ घ्यायला पाहिजे होती. त्यांनी पवारांची शपथ घेतली असती तर अनेकांना त्यांचे म्हणणे खरे वाटले असते,” असा टोला रामदास कदम यांनी लगावला होता. यानंतर आता, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे नाव घेत राऊतांवर बोचरी टिका केली आहे.

ईडीच्या धाडीनंतर, राऊतांवर बोचरी टीका करताना अतुल भातखळकर यांनी, “उध्दव ठाकरेंना काळजी… अटक झाली तर मुलाखत कोणाला देणार? पवारांनाही काळजी… शिवसेनेत राहून राष्ट्रवादीची भांडी कोण घासणार?” असे ट्विट केले आहे. एवढेच नाही, तर “मराठी माणसांचे गळे कापून बाळासाहेबांची शपथ घ्यायला किती निबर कातडी लागत असेल?, असा सवाल करत, ‘#५५लाखांचाबळी’, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.

आणखी एका ट्विटमध्ये भातखळकर म्हणाले, “करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय आणि इथे शिवीगाळ करून उपयोग ही नाही…. ED वाले ट्विटर वाचत नाहीत आणि पुरेसे कागदोपत्री पुरावे असल्याशिवाय घरी येत नाहीत. घरी आले की सोबत घेऊनच जातात. घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत.” या शिवाय, “पत्राचाळ घोटाळा म्हणजे शिवसेनेने मराठी माणसांच्या घरावर चालवलेला वरवंटा होता आणि हे निर्लज्ज आता मराठीच्या नावाने गळा कढतायत,” असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here