Ashish Shelar: भारत जोडोच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत काँग्रेसचे दोन टप्पे पडलेले असतील

आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी ‘भारत जोडो’च्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत काँग्रेसचे दोन टप्पे पडलेले असतील असा दावा केला आहे.

0

मुंबई,दि.६: मुंबई भाजपा (Mumbai BJP) अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ‘भारत जोडो’च्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत काँग्रेसचे दोन टप्पे पडलेले असतील असा दावा केला आहे. शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामागे भाजपाचा (BJP) हात असल्याचा आरोप करण्यात येत होता. अशातच काँग्रेसमध्येही फूट पडणार असल्याचे वक्तव्य आशिष शेलार यांनी केले आहे. आशिष शेलार यांनी ‘एबीपी माझा’ कट्ट्ट्यावर बोलताना हे विधान केलं आहे. काँग्रेसचे पहिल्या टप्प्यातील नेते दुसऱ्या टप्प्यात दिसणार नाहीत असा दावा त्यांनी केला आहे. आशिष शेलार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेनंतर आता काँग्रेसमध्येही फूट पडणार का? असे तर्क-वितर्क यानिमित्ताने लावले जात आहेत.

काय म्हणाले आशिष शेलार?

“काँग्रेसच्या ‘भारत जोडो’चा पहिला टप्पा आता नांदेडपासून सुरु होत आहे. पण दुसऱ्या टप्प्यापर्यंत काँग्रेसचे दोन टप्पे पडलेले दिसतील अशी महाराष्ट्रात स्थिती आहे,” असं आशिष शेलार यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले, काँग्रेसमध्ये फूट पडेल याची घोषणा करण्याचा मला अधिकार नाही. पण असं झालं तर नवल वाटू नये.

“पहिल्या टप्प्यात जे नेतृत्व करत आहेत ते दुसऱ्या टप्प्यानंतर कोणत्या टापूवर बसलेले असतील हे महाराष्ट्राला दिसेल,” असंही सूचक विधान त्यांनी यावेळी केलं.

नाना पटोले यांच्याकडून प्रतिक्रिया

“जे ‘तोडो’चा विचार ठेवतात त्यांना ‘जोडो’ कळणार नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार काही बोलण्याची गरज नाही,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

“आमचा सर्वांची मनं जोडण्याचा प्रयत्न आहे. पण तोडणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या डोक्यात नेहमीच मनं तोडणं, समाजात दरी निर्माण करणं असतं. ते फक्त कल्पना करत आहेत, हे वास्तवात होणार नाही,” असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here