मुंबई,दि.8: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी नुकताच मुंबई दौरा केला. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान (Amit Shah Mumbai Tour) त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाली असल्याचे समोर आले आहे. एका खासदाराचा स्वीय सचिव असल्याचे सांगत एका व्यक्ती काही तास अमित शाह (Amit Shah) यांच्याभोवती वावरत होता. या व्यक्तिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. हेमंत पवार असे या आरोपीचे नाव आहे.
हेमंत पवार नावाचा व्यक्ती अमित शाहांच्या जवळ फिरत होता. महत्वाची बाब म्हणजे संबंधित व्यक्तीनं आपण आंध्रप्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचं सुरक्षारक्षकांना भासवलं आणि बराच वेळ तो अमित शाहांच्या अवती-भोवती फिरत होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 4 आणि 5 ऑगस्ट रोजी मुंबई दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाचे आणि वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळाती गणरायाचे दर्शन घेतले होते. अमित शाह यांच्या सुरक्षितेची काळजी मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली होती. मुंबई पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांचेही शाह यांच्या सुरक्षितेची खबरदारी घेतली होती. मात्र, या दरम्यान एक व्यक्ती शाह यांच्या भोवती वावरत होती. आपण आंध्र प्रदेशातील खासदाराचे स्वीय सचिव असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, मंत्रालयातील एका अधिकाऱ्याला या व्यक्तीवर संशय आल्याने त्यांनी मुंबई पोलिसांना याची माहिती दिली.
मुंबई पोलिसांनी या व्यक्तिला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. आरोपीचे नाव हेमंत पवार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हेमंत पवार हा धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपी पवार याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, शाह यांच्या मुंबई दौऱ्यात मोठा कडेकोट बंदोबस्त असताना दुसरीकडे संशयास्पद व्यक्तीचा वावर कसा काय राहिला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी ही सुरक्षेत चूक नसल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांची ही सतर्कता होती. त्यामुळे त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. या आरोपीची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.