फतेहपूर,दि.11: उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात विकास दुबे नावाच्या तरुणाला दीड महिन्यात सहाव्यांदा साप चावला. सुदैवाने उपचारानंतर विकास यावेळीही बरा झाला. या घटनेने विकासच्या कुटुंबीयांसह डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. काही मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असल्याने कुटुंबीय घाबरले आहेत. मात्र याचदरम्यान पीडित विकासने नवा दावा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
विकास दुबे म्हणाला, मला शनिवार आणि रविवारी साप चावतात. जेव्हा मला तिसऱ्यांदा साप चावला, त्याच रात्री तो सापही माझ्या स्वप्नात आला आणि मला म्हणाला की मी तुला 9 वेळा चावेन. आठव्या वेळेपर्यंत तु वाचशील, पण नवव्या वेळेस कोणतीही शक्ती, तांत्रिक किंवा डॉक्टर तू वाचवू शकणार नाहीत. मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाईन.
सर्पदंशाने त्रस्त असलेला 24 वर्षीय विकास दुबे हा फतेहपूरच्या माळवा पोलीस स्टेशन हद्दीतील सौरा गावचा रहिवासी आहे. विकासने सांगितले की, त्याला 34 दिवसांत सहाव्यांदा साप चावला आहे. प्रत्येक वेळी मला साप चावण्यापूर्वीच धोका जाणवतो. शनिवार-रविवारच्या दिवशीच साप चावतो. जेव्हा मला तीनदा साप चावला तेव्हा माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मला घर सोडून बाहेर कुठेतरी राहण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर मी माझ्या मावशीच्या घरी गेलो. पण तिथेही मला साप चावला. त्यानंतर मी माझ्या काकाच्या घरी राहायला गेलो, पण सापाने मला तिथेही सोडले नाही आणि सहाव्यांदा मला चावा घेतला.
विकासच्या म्हणण्यानुसार, जेव्हा एखादा साप चावतो तेव्हा मला अगोदरच कळते की आज एक साप मला चावणार आहे. मी माझ्या घरातील सर्वांना सांगतो की आज मला साप चावेल. अलीकडेच साप स्वप्नात आला आणि म्हणाला की तो आणखी तीन वेळा चावेल. नवव्यांदा आपला जीव गमावेल. कोणतीही दैवी शक्ती किंवा डॉक्टर वाचवू शकणार नाहीत. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेश सरकारकडे माझी मागणी आहे की माझे आयुष्मान कार्ड बनवून काही आर्थिक मदत करावी.
दीड महिन्यापासून सर्पदंश सुरू आहे
पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जून रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बिछान्यातून उठत असताना विकासला पहिल्यांदा साप चावला. त्यावर त्यांनी त्याला उपचारासाठी खासगी नर्सिंग होममध्ये नेले. विकास दोन दिवस तिथेच दाखल होता. उपचारानंतर तो बरा होऊन घरी आला.
मात्र त्यानंतर पुन्हा 10 जूनच्या रात्री विकासला साप चावला. कुटुंबीयांनी विकासला त्याच खासगी रुग्णालयात नेले. उपचार झाले आणि विकास बरा होऊन घरी गेला. मात्र, सर्व खबरदारी घेतल्यानंतर 17 जून रोजी पुन्हा सापाने दंश केला. कुटुंबीयांनी त्याला पुन्हा त्याच रुग्णालयात नेले आणि त्याच्यावर उपचार झाले आणि विकास बरा झाला. या घटनेच्या अवघ्या चार दिवसांतच चौथ्यांदा सापाने विकासला आपला बळी बनवला.
तो धावत मावशीच्या घरी गेला पण सापाने त्याचा पाठलाग थांबवला नाही. नुकताच तो काकाच्या घरी गेला होता पण पुन्हा तीच घटना घडली. मामाच्या ठिकाणीही सापाने विकासला चावा घेतला. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली आहे.