मुंबई,दि.8: Bhupesh Baghel On Modi Government: फडणवीस, योगींचा उल्लेख करत काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याने मोठे भाकित केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. या निवडणुकीत इंडिया आघाडीला यश मिळाले. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाचा टेकू घ्यावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी संसदेतच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या घटक पक्षांची बैठक झाली आणि एकमताने नरेंद्र मोदी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली.
मात्र पलटी मारण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यामुळे हे सरकार कितपत चालेल हा प्रश्नच आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी मोठे भाकित केले आहे. आगामी सहा महिने ते वर्षभराच्या काळात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचे बघेल म्हणाले आहेत.
भुपेश बघेल यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर आपली भूमिका मांडली आहे. यात त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहन केले आहे. सहा महिने ते वर्षभरात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्याच्या तयारीत असून योगी आदित्यनाथ यांची खुर्चीही हलू लागली आहे. भजनलाल शर्माही डगमगायला लागले आहेत, असे बघेल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
एनडीएमधील घटकपक्ष जदयूबाबत बोलताना बघेल म्हणाले की, सरकार अजून स्थापन झालेले नाही, तो जदयूचे प्रवक्ते अग्निवीर योजना रद्द करण्याची मागणी करत आहेत. यासह जातीनिहाय जनगणनेसाठी दबाव टाकत आहेत. समान नागरी संहितेचीही गरज नसल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. हे सर्व मुद्दे राहुल गांधी यांनीही उपस्थित केले होते.
एनडीएचे सरकार स्थापन होईल, पण नंतर त्यांच्यातच खटके उडण्यास सुरुवात होईल. खटके उडायला लागले की सरकारचा पाया ठिसूळ व्हायला जास्त वेळ लागणार नाही. सरकार बनले पण नेहमी भांडणं होत राहतील, असेही बघेल म्हणाले.