Bhupesh Baghel: ‘यांच्या मुलींनी केले तर प्रेम आणि इतरांनी केले तर लव्ह जिहाद’ मुख्यमंत्री भूपेश बघेल

0

बिलासपुर,दि.13: छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी ‘लव्ह जिहाद’वरून विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार हल्ला चढवला आहे. बुधवारी बिलासपूरमध्ये बघेल म्हणाले की, ‘यांच्या मुलींनी केले तर प्रेम आणि इतरांनी केले तर लव्ह जिहाद’. जिल्ह्यातील अकलतरी गावात एका खाजगी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बघेल यांनी आरोप केला की, बेमेटाराच्या बिरनपूर गावात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून भाजप राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे.

‘भाजपा नेत्यांच्या मुलींनी मुस्लिम समाजातील मुलासोबत लग्न केलं तर ते प्रेम असतं आणि इतर मुली मुस्लिम मुलाशी लग्न करतात तेव्हा तो जिहाद ठरतो’, असं म्हणत भूपेश बघेल यांनी भाजपाला लक्ष्य केलं.

का असे म्हणाले भूपेश बघेल? | Bhupesh Baghel

छत्तीसगडच्या बेमतेरा शहरापासून 60 किमी अंतरावर असलेल्या बिनारपूर गावात आठ एप्रिल रोजी शाळेतील मुलांमध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर धार्मिक हिंसाचारात झालं. यामुळे भुनेश्वर साहू या 22 वर्षीय तरुणाचा यात मृत्यू झाला. तर, तीन पोलीस जखमी झाले होते. यावरून हिंदू संघटनांनी निषेध व्यक्त केला होता. या प्रकरणाला भाजपाकडून जाणीवपूर्वक जातीय रंग दिला जातोय, असा दावा भूपेश बघेल यांनी केला आहे. “या प्रकरणाच्या चौकशीसाठी भाजपाने कोणतीही कमिटी स्थापन केली नाही. भाजपाचे सर्व खासदार गर्दीच्या मागे धावत आहेत. मृत मुलाच्या कुटुंबीयांप्रती दुःख व्यक्त करण्यापेक्षा ते हे प्रकरण अधिक भडकवत आहेत”, असंही भूपेश बघेल म्हणाले.

‘ते लव्ह जिहादविषयी बोलतात. पण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मुलींनीच मुस्लिम समाजातील मुलाशी लग्न केलं आहे. मग हा लव्ह जिहाद ठरत नाही का? छत्तीसगडमधील भाजपाच्या मोठ्या नेत्याची मुलगी सध्या कुठे आहे विचारा? हा लव्ह जिहाद नाहीये का? जेव्हा त्यांची मुलगी असं करते तेव्हा ते प्रेम आणि इतर कोणी असं करत असेल तेव्हा तो जिहाद ठरतो’, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

“हे सर्व थांबवण्यासाठी भाजपाने आतापर्यंत काय केलं आहे? या सर्व प्रकरणातून ते फक्त राजकीय फायदा घेत आहेत. ते त्यांच्या जावयाला मंत्री, खासदार बनवतात आणि इतरांना वेगळा न्याय लावतात”, असंही बघेल म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here