भिवंडी,दि.१२: Bhiwandi Crime News: भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्याचा सहकारी तेजस तांगडी यांची धारदार शस्त्रांनी निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी येथे ही घटना घडली. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
‘जे डी टी इंटरप्रायसेस’ या कार्यालयात प्रफुल्ल तांगडी आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत बसले होते. कार्यालयात बसलेले असतानाच सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास काही हल्लेखोरांनी कार्यालयात शिरून त्यांच्यावर हल्ला केला.
चार ते पाच हल्लेखोर अचानक तिथे आले आणि त्यांनी धारदार शस्त्रांनी प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या हत्याकांडानंतर, परिसरात तणावाचे वातावरण आहे. यामुळे, परिसरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.