सोलापूर,दि.28: शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी अभिनेता भाऊ कदम (Bhau Kadam) उपस्थित होता. चंद्रकांत पाटील हे विभागीय नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. नवीन वर्षात 26, 27 आणि 28 जानेवारीला सोलापुरात विभागीय नाट्यसंमेलन पार पडणार आहे.
अभिनेता भाऊ कदमने सोलापूरमधील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोलापूरने मायेची उब दिली असल्याचं भाऊ कदम म्हणाले.
भाऊ कदम म्हणाला…
सोलापूर येथील विभागीय नाट्य संमेलनाच्या कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान अभिनेता भाऊ कदम म्हणाला,”नाटकाच्या निमित्ताने सोलापूरला येणं होत होतं. आज नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनादरम्यान आलो आहे. सोलापूरला आलो की चादर घेऊन जायचो. एक मायेची उब सोलापूरने दिली आहे”.
चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरातील विभागीय नाट्य संमेलनाला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना घेऊन येण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलंय.
अमिताभ बच्चन यांना सोलापूरला…
“भाऊ कदम यांची एण्ट्री झाली की सगळेच खळखळून हसतो. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ताणतणाव असतात. मात्र भाऊ कदम यांची एण्ट्री झाली की हा ताणतणाव कमी होतो. पुण्यातील नॅशनल बुक ट्रस्टच्या संमेलनात 11 कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली आहे. त्याप्रमाणे सोलापुरातील विभागीय नाट्य संमेलनाचेही रेकॉर्ड झाले पाहिजेत. दर आठवड्याला सोलापूरला येण्याचं मी कबूल केलं आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व निधी मंजूर झाला पाहिजे यासाठी मी काम करतोय. नियोजन समितीतून भरीव निधी नाट्य संमेलनाला देऊ. मी अडीच लाख स्वतःच्या खिशातून दिले आहेत. तुम्हीही भरीव मदत करा. त्याचप्रमाणे नाट्य संमेलनाला अमिताभ बच्चन यांना घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. आशिष शेलार यांच्याशी बोलतो आणि अमिताभ बच्चन यांना सोलापूरला घेऊन येण्यासाठी सांगतो,” असं ते म्हणाले.