नवी दिल्ली,दि.८: काँग्रेसचे “भारत जोडो यात्रा” (Bharat Jodo Yatra Twitter Account) ट्विटर अकाऊंट बंद करण्याच्या आदेशावर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय दिला आहे. बंगळुरूतील एक वाणिज्य न्यायालयाने सोमवारी काँग्रेसचे “भारत जोडो यात्रा” (Bharat Jodo Yatra) ट्विटर अकाऊंट बंद करण्याचे आदेश दिले होते. भारत जोडो यात्रा या ट्विटर अकाऊंटवरुन कॉपीराईटच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत हे अकाऊंट ब्लॉक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
एमआरटी म्युझिक कंपनीने याबाबत न्यायालयात कॉपीराईटचा दावा केला होता. त्यामध्ये, या ट्विटर अकाऊंटने अवैध पद्धतीने चित्रपट केजीएफ- २ चित्रपटातील गाण्याचा वापर केल्याचे म्हटले होते. ट्विटर खाती तात्पुरत्या स्वरुपात ब्लॉक करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.
सोमवारी दिलेल्या या आदेशानंतर, दुसऱ्याच दिवशी कर्नाटक उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्विटर, फेसबूक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरून संबंधित सर्व कॉपीराइटचं उल्लंघन केलेली सामग्री काढून टाकावी, असं म्हटलं आहे. यासाठी उद्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
‘एमआरटी म्युझिक’ कंपनीने काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनाटे यांच्याविरोधात यशवंतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. काँग्रेसने ‘केजीएफ-२’ या चित्रपटातील संगीत बेकायदेशीरपणे वापरल्याचा (कॉपीराइट) आरोप कंपनीने केला होता.
एमआरटी कंपनीने न्यायालयात सादर केलेले पुरावे आणि युक्तीवाद ऐकल्यानंतर, बंगळुरू न्यायालयाने काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करण्याचे आदेश ट्विटर कंपनीला दिले होते. पण आज कर्नाटक उच्च न्यायालयाने बंगळुरू न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे.