बेल्लारी,दि.8: लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील बेल्लारी येथे पोलिसांनी 5.60 कोटी रुपये रोख, 3 किलो सोने, 103 किलो दागिने आणि 68 चांदीच्या सळ्या जप्त केल्या आहेत. पोलिसांनी बेल्लारीच्या ब्रूस टाऊनमध्ये छापा टाकला होता. कांबळी बाजारातील हेमा ज्वेलर्सचे मालक नरेश यांच्या घरातून ही रक्कम सापडली असून आरोपी नरेशला ताब्यात घेऊन अधिक चौकशी करण्यात येत आहे.
बेल्लारीचे एसपी रणजीत कुमार बंडारू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम नरेश सोनी यांची आहे. एकूण 5 कोटी 60 लाख रुपये रोख, 68 चांदीच्या सळ्या, 103 किलो चांदीचे दागिने आणि 3 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. यासंबंधीचे कोणतेही वैध कागदपत्र आम्हाला मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांना हवाला व्यवहाराचा संशय असून तपास सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी केपी कायद्याच्या कलम ९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपासानंतर माहिती आयकर विभागाला दिली जाईल, असे ते म्हणाले.