मुंबई,दि.१४: Balasaheb Thorat On Sharad Pawar: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अचानकपणे बंडखोरी केली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. मात्र, यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी, पुन्हा पक्ष बांधणीचे शरद पवार यांच्यासमोर असलेले आव्हान याबाबत काँग्रेसकडून भाष्य करण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले बाळासाहेब थोरात? | Balasaheb Thorat On Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवारांना समर्थन देणाऱ्या आमदारांचा आकडा अद्याप समोर आला नाही. असे असले तरी अजित पवार यांना पाठिंबा वाढताना पाहायला मिळत आहे. या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाची पुन्हा उभारणी करू शकतील का? असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आला होता. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना, शरद पवार फक्त नमस्कार करत फिरले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. (Balasaheb Thorat On Sharad Pawar)
चांगला निकाल आणतील
शरद पवार राज्यात फिरून लोकसभा आणि विधानसभेला चांगला निकाल आणतील. शरद पवार फक्त नमस्कार करत फिरले, तरी राष्ट्रवादी पक्ष उभा राहील. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार निवडून येतील, असा दावा करताना, काहीतरी होणार असे वाटत होते आणि अचानक अजित पवार सरकारबरोबर जात उपमुख्यमंत्री झाले. काहीतरी शिजत होते, याचा वास आम्हाला येत होता. महाविकास आघाडी म्हणून आम्ही खूप चांगले होतो. वज्रमूठ सभेमुळे लोकांमध्ये उर्जा निर्माण झाली होती. त्यावेळी झालेल्या काही सर्व्हेत महाविकास आघाडीला लोकसभेच्या ३८ जागा आणि विधानसभेला १८० जागा मिळत असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे वाटायचे की भाजपाला आघाडी तोडण्याशिवाय पर्याय नाही, असे थोरात म्हणाले.
दरम्यान, शरद पवारांनी काँग्रेसमध्ये यावे, असे वाटते का? असे विचारले असता, शरद पवार यांनी स्वतंत्रपणे राजकारण केले आहे. काँग्रेस आणि शरद पवारांचा विचार वेगळा नाही. फक्त दोन पक्ष आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ज्या पद्धतीने आम्ही चाललो आहे, त्यातूनच यश मिळवू, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.