बाळासाहेब तुमचे वडील असले तरी ते सगळ्या शिवसैनिकांचं दैवत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

खेड,दि.१९: ५ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) खेडमधील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुन्हा खेडमधल्या त्याच गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) जाहीर सभा घेतली असून या सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बाळासाहेब तुमचे वडील असले तरी ते सगळ्या शिवसैनिकांचं दैवत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तुम्ही खोके, गद्दार म्हणून किती पाप झाकणार? बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते हे किती वेळा सांगणार? हे जगाला मान्य आहे. पण बाळासाहेब तुमचे वडील असले, तरी ते सगळ्या शिवसैनिकांचं दैवत होते. तुम्ही त्यांना वडील म्हणून छोटं करू नका महाराष्ट्रातली जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात. पण त्यावर आपण काहीच बोलत नाहीत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ येते. मणिशंकर अय्यरनं सावरकरांबाबत वक्तव्य केलं होतं, तेव्हा बाळासाहेबांनी त्याला चपलेनं झोडलं होतं. पण राहुल गांधींच्या विधानावर तुम्ही काहीच बोलत नाहीत. हे कसलं हिंदुत्व आहे? सावरकरांचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही, असे शिंदे म्हणाले.

सत्तेसाठी तुम्ही शिवसेना एनसीपी, काँग्रेसकडे गहाण ठेवली. गद्दारी आम्ही नाही केली. गद्दारी २०१९ला झाली. हिंदुत्वाचं राजकारण केलं ही चूक झाली असं विधानसभेत उद्धव ठाकरेंनी सांगितलं. म्हणजे तुम्ही बाळासाहेबांना चुकीचं ठरवलंत? बाळासाहेबांच्या भूमिकेला चुकीचं ठरवलंत. कशासाठी? सत्तेसाठी? यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैवं काय असू शकतं? असेही शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती

तुम्ही बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार आहात. पण विचारांचा वारसा तुम्ही सोडलात. आम्हाला तुमची संपत्ती नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. मला पत्रकारांनी विचारलं की शिवसेना मिळाली, धनुष्यबाण मिळालं., तुम्ही त्यांच्या मालमत्तेवर दावा सांगणार का? बिलकुल नाही असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली.

परदेशात या देशाची बदनामी करणारे राहुल गांधी यांना पंतप्रधान करायला निघालेल्या लोकांबरोबर आपण जाणार आहोत. बाळासाहेबांनी ज्यांना नेहमी दूर ठेवलं अशा लोकांना तुम्ही जवळ करणार का? बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवस देशाचा पंतप्रधान करा, देशातलं ३७० कलम हटवतो. राम मंदिर बांधण्याचं स्वप्नं बाळासाहेबांचं होतं. मोदींच्या नेतृत्वाखाली अमित शाह यांनी ३७० कलम हटवून दाखवलं. मग बाळासाहेबांचं स्वप्नं कुणी पूर्ण केलं? मग आमचा निर्णय चूक आहे की बरोबर आहे?

गेल्या आठवड्यात याच महिन्यात एक फुसका बार, आपटी बार येऊन गेला. उत्तर आरोप किंवा टीकेला द्यायचं असतं. पण तोच तो थयथयाट, आदळआपट याला काय उत्तर देणार? मुंबईतही सहा महिन्यांपासून अशीच आदळआपट चालू आहे. तोच खेळ चालू आहे, फक्त जागा बदलली होती.

माणसाला स्वत:च्या नेतृत्वावर विश्वास असायला हवा. किती लोक घालवलेत. नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईकांपासून सगळे गेले. रामदास कदम, मलाही तुम्ही असंच केलं. जेव्हा स्वार्थ डोक्यात जातो, सत्तेची हव्यास जाते तेव्हा त्याला काहीही दिसत नाही, सुचत नाही. हा एकनाथ शिंदे आज, काल आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे.

तुम्ही सगळ्यांना सांगितलंत की दरवाजे उघडे आहेत. उघडेच ठेवा. सगळे निघून जातील. शेवटी तुम्हीच राहाल. हम दो, हमारे दो. माझं कुटुंब माझीच जबाबदारी: एकनाथ शिंदे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here