खुनीहल्ला केल्याप्रकरणी तडीपार असणाऱ्या आरोपीस जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.२६: खुनीहल्ला केल्याप्रकरणी तडीपार असणाऱ्या आरोपीस न्यायालयाने जामीन मंजूर केला. विपुल रामदास शिंदे असे जामीन मंजूर करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यात हकिकत अशी की, दि. ०५/०८/२०२२ रोजी सोलापूर शहरातून तडीपार असताना संध्याकाळच्या सुमारास सोलापुर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या नवी पेठ येथील संजय मोबाईल शॉपी या शोरुममध्ये हातात कोयता घेवून घुसून तेथील मॅनेजरला व कामगारास दमदाटी करुन तुमचा मालक कुठे आहे त्याच्यामुळे मी जेलमध्ये गेलो. मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला धंदा करायचा असेल तर मला महिन्याला १०,०००/- रुपये हफ्ता दया नाहीतर मी तुम्हाला धंदा करु देणार नाही असे म्हणून दुकानातील काचा तोडफोड करण्यास चालू केली व त्यास तेथील मॅनेजरने विरोध केला असता त्यास तु मध्ये येवू नको असे म्हणून हातातील लोखंडी कोयत्याने मॅनेजरला शिवीगाळ करुन खुनी हल्ला करुन गंभीर दुखापत केली.

तसेच आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली. अशाप्रकारे तडीपार असून देखील शहरात येवून खुनीहल्ला करुन दहशत निर्माण करणाऱ्या तडीपार आरोपी विपुल रामदास शिंदे याच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी आरोपी विपुल रामदास शिंदे यास अटक करण्यात आली होती. सदर कामी जामीन मिळण्यापोटी सदर आरोपीने अॅड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालय येथे जामीनासाठी अर्ज दाखल केला.

यात आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सदर गुन्हयाच्या दोषारोपपत्रामध्ये सदर फिर्यादीचे जखमी असल्याबद्दलचे प्रमाणपत्र बघता त्यास धारदार शस्त्राने जखम झाल्याचे दिसून येत नाही. तसेच सदर आरोपीची यापूर्वीच खुन खटल्यातून निर्दोष मुक्तता झालेली असल्यामुळे त्यास सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही. तसेच ज्या मोबाईल शॉपीमध्ये सदर तथाकथित प्रकार घडला त्याठिकाणी कुठलेच रक्ताचे डाग आढळून आलेले नाहीत. तसेच प्रत्यक्ष सदरची घटना बघणाऱ्या साक्षीदारांच्या पोलीसांनी घेतलेल्या जबाबामध्ये विसंगती आढळून येते असे मुद्दे मांडले.

त्यापोटी आरोपीच्या वकिलांनी अनेक उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले. सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी आरोपी विपुल रामदास शिंदे याची जामीनावर मुक्तता केली. यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. अजिंक्य जाधव, अॅड. सुमित लवटे, अॅड. फैयाज शेख यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here