मुंबई,दि.११: Bachchu Kadu On Politics: अजित पवार यांचा गट (राष्ट्रवादी) सत्तेत सहभागी झाल्याने बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवारांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. “राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. आपण राष्ट्रवादीला कंटाळून भाजपाबरोबर गेलो होतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम्हाला काम करू देत नाही, असाच सूर होता. आता भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ केल्याने भाजपाला साथ देणे चुकीचे ठरल्याची भावना अनेक आमदारांची आहे,” अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नाराजी व्यक्त केली होती. बच्चू कडू यांचा नाराजीचा सूर अजूनही कायम आहे. (Maharashtra Politics)
काय म्हणाले आमदार बच्चू कडू? | Bachchu Kadu On Politics
महाविकास आघाडीमध्ये बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. परंतु महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद दिलेलं नाही. त्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याचं बोललं जात आहे. बच्चू कडू यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. यावेळी त्यांना आमदारांमधील नाराजीबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, कोणताही आमदार आस लावून बसलेला नाही. केवळ तुम्हा पत्रकारांना वाटतं की, आमदार आस लावून बसलेत. आम्ही काय पिशवी घेऊन बसलोय का? वाटून टाकायला मंत्रिपद काय भाजीपाला आहे का? मुळात कोणी पिशवी घेऊन बसणार आहे का? असे उलट प्रश्न करत बच्चू कडू यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.
सहन करण्याची एक मर्यादा असते… | Bachchu Kadu
गेल्या आठवड्यात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारल्यावर ते म्हणाले होते की, सहन करण्याची एक मर्यादा असते, ती मर्यादा तुटली की कुणी कुणाचं नसतं. माझं मत असं आहे की, मी मंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला नव्हता. पण एकंदरीत जी राजकीय व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेत कोण कसं अडचणीत येतं, हे मी सांगितलं.”
भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. तीन दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले होते की, ” नव्या घडामोडींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या ४० आमदारांची मोठी गोची झाली आहे. या आमदारांची दोन्ही बाजूने कोंडी झाली आहे. एक वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला कंटाळून आपण भाजपाला पाठिंबा दिला होता. आता अजित पवार हे पुन्हा निधी खेचून घेतील, आमच्या निर्णयात आडवे येतील अशी आमदारांना भीती आहे. त्याचबरोबर आम्ही सरकारमधील घटक पक्ष आहोत, राष्ट्रवादीला सोबत घेण्याआधी किमान आमच्याबरोबर चर्चा करायला हवी होती. पण तसं झाली नाही.