“…त्यामुळेच पंकजा मुंडे यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल” आमदार बच्चू कडू

0

मुंबई,दि.२५: आमदार बच्चू कडू यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. पंकजा मुंडे यांना जीएसटी विभागाने दणका दिला आहे. रविवारी (२४ सप्टेंबर) जीएसटी विभागाने पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कारवाई केली असून सुमारे १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पंकजा मुंडे यांच्यावरील कारवाईनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क लावले जात आहेत. दरम्यान, प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी कारवाईबाबत मोठं विधान केलं आहे.

त्यामुळेच पंकजा मुंडे यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल

“पंकजा मुंडे यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरल्या, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, असं मला वाटतं” असं थेट वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. अमरावतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडूंनी हे वक्तव्य केलं.

काय आहे प्रकरण?

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जीएसटी विभागाने एप्रिल महिन्यात या कारखान्यावर छापेमारी केली होती. त्यावेळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररित्या १९ कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी जीएसटी विभागाने शनिवारी पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला नोटीस पाठवली होती. रविवारी केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here