जम्मू,दि.5: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. बुधवारी अमित शाह यांची बारामुल्ला येथे जाहीर सभा होती. कलम 370 हटवल्यानंतर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत. बारामुल्ला येथे अमित शाह यांनी काश्मीरमधील जनतेला संबधित केलं. पण संबोधन करत असताना अमित शाह यांनी अचानक आपलं भाषण थांबवलं… त्याला कारणही तसेच होतं, अजान सुरु झालं होतं, त्यामुळे अमित शाह यांनी भाषण थांबवलं.. त्यानंतर उपस्थित जनतेला विचारुन पुन्हा त्यांनी संबोधन केलं.
बारामुल्ला येथे अमित शाह यांच्या सभेला प्रचंड गर्दी उसळळी होती. व्यासपीठावरुन गृहमंत्री अमित शाह सुद्धा भाषणात गुंग झाले होते. त्याच वेळी त्यांना समजलं की, जवळच्या मशिदीमध्ये अजान सुरु झाली आहे. अमित शाह यांनी तात्काळ आपलं भाषण थांबवलं. त्यानंतर उपस्थित जनतेला विचारुन अमित शाह यांनी पुन्हा एकदा भाषणास सुरुवात केली. त्यावेळी ते म्हणाले की, जवळच्या मशिदीमध्ये प्रार्थना सुरु होणार असल्याचं मला एका चिठ्ठीद्वारे समजलं. आता प्रार्थना संपली आहे. पुन्हा भाषण सुरु करतो. चालेल ना?
जम्मू-कश्मीरमध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी व्यासपीठावर बुलेट प्रूफ ग्लास लावण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बारामुल्ला येथे भाषण सुरु करण्याआधी अमित शाह यांनी बुलेट प्रूफ ग्लास काढायला लावले. दरम्यान, अमित शाह यांनी पहिल्यांदाच असे केलं नाही. याआधी अमित शाह यांनी व्यासपीठावरील बुलेट प्रूफ ग्लास काढायला लावले होते.
बारामुल्ला येथील सभेत बोलताना अमित शाह यांनी घराणेशाहीवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील घाटीमध्ये, गाव-खेड्यात लोकशाहीला पोहचवण्याचं काम केलं. आता घाटी आणि जम्मू काश्मीरमध्ये तीस हजार पेक्षा जास्त लोक पंचायत, तहसीलमध्ये नेतृत्व करत आहेत. याआधी काश्मीरमध्ये लोकशाही फक्त तीन कुटुंब, 87 आमदार आणि सहा खासदार यांच्यापर्यंतच मर्यादित होती, असा निशाणा अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील नेत्यांना लगावला.