मुंबई,दि.24: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल काल (दि.23) लागला. यावेळी महायुतीला 230 जागा तर महाविकास आघाडीला फक्त 47 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 149 पैकी 132 जागांवर विजय मिळाला आहे. राज्यात महायुतीला राक्षसी बहुमत मिळेल असे चित्र नव्हते तरी, असा निकाल लागला आहे. असे विधान वकील असीम सरोदे यांनी केले आहे. तसेच या निकालाविरोधात आपण कोर्टात आव्हान देणार असेही सरोदे म्हणाले.
tv9 मराठी वृत्तवाहिनीशी सरोदे बोलत होते. वकील सरोदे यांनी टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. असीम सरोदे म्हणाले, हा निकाल पूर्ण अनाकलनीय आणि अविश्वसनीय अशा स्वरुपाचा आहे. महाराष्ट्रातील लोक एवढा राक्षसी बहुमत चित्र नव्हत असं बोलत आहेत. तरीसुद्धा मत मिळाली आहेत, त्यामुळेच अविश्वसनीय आहेत.
आपण कुणाला मतदान करतोय आणि ते मत कुणाला जातंय याबाबत लोक यावर संशय व्यक्त करत आहेत. याबाबत कोर्ट कायदेशीर बाबी तपासू शकते. पण तांत्रिक बाजू आहे, त्यातल्या अनेक गोष्टी सिद्ध होऊ शकत नाही. त्याचा गैरफायदा राजकीय पक्षांनी घाऊक पद्धतीने घ्यायचा आणि कुठलीही लाट नसताना बहुमत मिळवायचं या शंकांना वाट करून देण्यासाठी अनेकांनी कोर्टात जायचा निर्णय घेतला आहे असे सरोदेंनी सांगितले.
तसेच अनेक पराभूत उमेदवारांनी मला संपर्क केला आहे. त्यांनी या निवडणुकीला कोर्टात आव्हान देण्याचे सांगितले आहे. प्रत्येकाचे आक्षेप पाहून आम्ही स्वतंत्र याचिका दाखल करू. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या हरलेल्या प्रत्येक उमदेवाराने कोर्टात याचिका दाखल करावी. निवडणुकीतली संपूर्ण प्रक्रिया शंकास्पद आहे हे सामान्यातला सामान्य माणूस बोलतोय. त्यामुळे कोर्टात याबद्दल दाद मागितली पाहिजे. मोकळ्या वातावरणात जर निवडणूक झाली नसेल तर कोर्टात याबाबत आव्हान दिले पाहिजे असे आवाहनही सरोदे यांनी केले आहे.