नवी दिल्ली,दि.12: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. पण त्याच्या अटकेचे प्रकरण ईडीने सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे सोपवले आहे.
केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या खंडपीठाकडे पाठवले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीशांचे खंडपीठ केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. या प्रकरणात सरन्यायाधीश तीन न्यायाधीशांची नियुक्ती करतील. या प्रकरणाची मोठ्या खंडपीठासमोर सुनावणी होईपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मात्र केजरीवाल सध्या तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत. ते सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत पण त्यांना ईडी प्रकरणात जामीन मिळाला आहे. अशा स्थितीत ते सध्या तुरुंगातच राहणार आहेत.
केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी सांगितले की, सीबीआय प्रकरणी 18 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी आहे. या प्रकरणाचा निर्णय आल्यानंतरच केजरीवाल बाहेर पडतील की नाही हे कळेल. मात्र, केजरीवाल तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता प्रबळ आहे.
न्यायालयाने काय म्हटले?
केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करताना न्यायालयाने सांगितले की, दिल्लीचे मुख्यमंत्री 90 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात आहेत. ते निवडून आलेले नेते आहेत आणि ते या पदावर कायम राहायचे की नाही याचा निर्णय ते घेतील. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, आम्ही निर्णयात निवडणूक निधीबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.