बार्शी,दि.10: मराठा आरक्षण चळवळीत आम्हाला तुम्ही विश्वासात घेत नसून यापुढे तुमचा आमचा संबंध नाही, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर करत आमच्या पातळीवर आम्ही मराठा आरक्षणाचा लढा लढू, अशी भूमिका बार्शीतील मराठा आरक्षण चळवळीचे कार्यकर्ते आण्णा शिंदे यांनी घेतली.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासंदर्भात 11 प्रश्न विचारत बार्शीचे मराठा आरक्षण चळवळीचे कार्यकर्ते आण्णा शिंदे यांनी सोमवारी एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले. बार्शीत शिवसृष्टीसमोर एक दिवसीय उपोषणपूर्वी शिंदे यांची सभा झाली. यावेळी शिंदे म्हणाले, मराठा आरक्षण चळवळीतील मी कार्यकर्ता आहे. राज्यात स्व. विलासराव देशमुख यांचे सरकार होते तेव्हाही आरक्षणासाठी आपण आंदोलन केले असून मराठा समाजाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्याचा मला अधिकार आहे.
कोणाची हिम्मत असेल तर…
यावेळी जरांगे पाटील यांना उद्देशून शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत ज्या मराठा समाजामुळे खासदार निवडून आले, त्यांनी पाठिंबा द्यायला हवा होता.यावर जरांगे पाटील काहीच बोलले नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा लढा आपण लढणार असून कोणाची हिम्मत असेल तर माझ्या केसाला धक्का लावून दाखवा, असेही शिंदे म्हणाले.
यानंतर शिंदे यांच्यासह मराठा बांधवांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रमोद वाघमोडे , ॲड. आण्णा शिंदे, शंकर वाघमारे, महेश देशमुख, नागजी अडसूळ, अमोल झांबरे आदी उपस्थित होते.